अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड ढवळून निघाले आहे. नेपोटिजमच्या मुद्यावरचे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतेय. कंगना राणौत, सोनू निगम अशा अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला. आता गायक अभिजीत भट्टाचार्य यानेही नेपोटिजमवरून थेट सलमान खानला लक्ष्य केले आहे. एखादे गाणे कोणी गायला हवे आणि कोण गाऊ नये हे ठरवणारा सलमान कोण? असा संतप्त सवाल त्याने विचारला आहे.
90 च्या दशकातील काळ आणि आत्ताचा काळ याची तुलना करताना अभिजीत म्हणाला, ‘90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये कुठलीही गटबाजी नव्हती. पण आता या गटबाजीने इंडस्ट्री गढूळ झाली आहे. त्यावेळी संगीत क्षेत्राची इतकी दयनीय अवस्था नव्हती. चित्रपटाचे दिग्दशर््क आणि कंपोजर चित्रपटात कोण गाणार हे ठरवायचे. पण आता काही कंपन्या आणि चित्रपटाचे कलाकार गाणे कोण गाणार हे ठरवतात. एखादे गाणे कोण गाणार, कोण नाही हे ठरवणारा सलमान कोण? गायकाकडून गाणे काढून ते स्वत: गाणारा हा आहे तरी कोण? हा सरळ सरळ भेदभाव आहे. ’
सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर करण जोहर आणि सलमान खान सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होत आहेत. या दोघांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही होत आहे. फिल्म इंडस्ट्रीतही अनेकांनी या दोघांवर‘दबंगगिरी’चे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अभिनव कश्यप याने सलमान व त्याच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. सलमान व त्याच्या कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, असे तो म्हणाला होता. गायक सोनू निगम याने अलीकडे बॉलिवूडच्या घराणेशाहीवर प्रहार केला होता. संगीत क्षेत्रातही काही म्युझिक कंपन्यांची मक्तेदारी आहे, असा आरोप त्याने केला होता.