महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन पित्याच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत आला. पण इतक्या वर्षांत पित्यासारखे यश मात्र त्याला मिळवता आले नाही. यशाची चव चाखण्याआधीच ‘फ्लॉप अॅक्टर’चा शिक्का त्याच्या माथी बसला. हा शिक्का अभिषेकला अद्यापही पुसता आलेला नाही. २००० साली ‘रेफ्युजी’ या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये कामे करत तीन फिल्मफेअर पुरस्कारांवर नाव कोरले. पण अभिषेकला ‘फ्लॉप’ म्हणून हिणवणा-यांच्या हे गावीही नाही. आज (5 फेब्रुवारी) अभिषेकचा वाढदिवस. आज त्याच्या वाढदिवशी त्याच्या सर्वोत्तम चित्रपटांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
‘गुरू’ हा अभिषेकच्या दमदार अभिनयाचा परिचय देणारा असाच एक चित्रपट. हा चित्रपट अभिषेकच्या करिअरमधील टर्निंग पॉर्इंट मानला जातो. या चित्रपटासाठी अभिषेकला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.
‘युवा’ या चित्रपटात अभिषेकने साकारलेला लल्लन सिंह अफलातून होता. हे निगेटीव्ह कॅरेक्टर अभिषेकने इतक्या ताकदीने पडद्यावर साकारले की, त्याच्या भूमिकेचे अपार कौतुक झाले. या चित्रपटासाठीही अभिषेकला फिल्मफेअरचा बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला.
‘सरकार’ या चित्रपटातही अभिषेकने आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवत, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
‘ब्लफमास्टर’ या चित्रपटातही अभिषेकने आपल्यातील बेस्ट दिले. यात त्याने एक गाणेही गायले.‘पा’ या चित्रपटातही अभिषेकने यादगार भूमिका साकारली. विशेष म्हणजे पिता अमिताभ बच्चन यांच्या पित्याच्या भूमिकेत तो दिसला. ‘दिल्ली 6’ या अभिषेकच्या चित्रपटाला ५७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्काराने गौरविले गेले.
.