अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा ‘गुरु’ हा सिनेमा 2007 साली प्रदर्शित झाला होता. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा अभिषेकच्या फिल्मी करिअरमधील सर्वात हिट चित्रपट आहे. हा सिनेमा हिट झाला आणि लगेच ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न झाले. अगदी ‘जंजीर’ हिट झाल्यानंतर अमिताभ बच्चन व जया भादुडी यांचे झाले होते तसेच. आता अचानक ‘गुरु’ आठवण्याचे कारण म्हणजे, अभिषेकने या चित्रपटाबद्दल शेअर केलेला एक किस्सा.
होय, ‘गुरु’ या चित्रपटातील ‘तेरे बिना’ या गाण्याच्या शूटींगदरम्यानचा एक किस्सा अभिषेकने शेअर केला आहे. हा किस्सा शेअर करताना तो लिहितो, ‘2006 आक्टोबर मदुराईमध्ये गुरुच्या सेटवऱ़ आमच्या फोटोशूटनंतर तेरे बिन हे गाणे शूट करण्याचा निर्णय मणिरत्नम यांनी घेतला होता. तुम्ही थोडे काळजीपूर्वक बघितल्यास या गाण्यात माझे केस लांब आहेत. कारण त्यावेळी मी ‘झूम बराबर झूम’साठी केस वाढवले होते. याचदरम्यान तेरे बिनचे शूट होणार होते. मी शेव केली पण वाढलेले केस कापू शकत नव्हतो. त्यामुळेच याच लूकमध्ये आम्ही तेरे बिन या गाण्याचे शूट केले. माझे केसे लहान दिसावेत, माझा लूक गुरुकांत देसाई या पात्राशी मेळ खावा म्हणून ते लोक माझ्या केसांना पिन लावत..’
पुढे त्याने लिहिले, ‘जब लोग तुम्हारे खिलाफ बोलने लगे, समझ लो तरक्की कर रहे हो, हा फेमस डायलॉग गुरु म्हणतो, तेव्हाचा हा फोटो. मणि यांनी अगदी शेवटी हा सीन शूट करण्याचा निर्णय घेतला होता. रात्री आम्ही गाणे शूट केले आणि झोपलो. सकाळी उठल्यावर आम्ही हा सीन शूट केला होता.’