चित्रपटसृष्टीत सध्या बायोपिकची धूम आहे. त्यातल्या त्यात राजकीय नेत्यांवरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील सिनेमांची चर्चा आहे. ठाकरे, द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर आणि पी.एम. नरेंद्र मोदी या सिनेमांची सध्या चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या सिनेमात राजकीय व्यक्तीरेखा कोण साकारणार याची उत्सुकता आहे. 'द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमात अभिनेता अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची हुबेहूब भूमिका साकारण्याचा प्रयत्न केल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. या सिनेमात विविध राजकीय नेते पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या भूमिका कोण साकारणार याबाबत रसिकांना उत्सुकता आहे. या सिनेमात माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणारा कलाकार शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.
द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर सिनेमाचे दिग्दर्शक विजय यांनी यासाठी मुंबई, बिहार, चंदीगड इथं अनेक जणांचे ऑडिशन्स घेतले. या ऑडिशन्सनंतर अखेर बिहारमधील एका व्यक्तीची वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली. बिहारमध्ये पाणीपुरी विक्री करणाऱ्या ३० वर्षीय तरुण राम अवतार भारद्वाजची ही भूमिका साकारण्यासाठी निवड करण्यात आली. या तरुणाचे हास्य वाजपेयींसारखंच आहे. त्याला अभिनय येत नाही. बड्या बड्या कलाकारांना पाहून त्याला अवघडल्यारखं व्हायचं असं विजय यांनी सांगितलं.
अलीकडे एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ ऑस्करसाठी पाठवला जाण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. आपण कुठपर्यंत भारताची गरीबी विकणार आहोत? कुठपर्यंत भारताचे मागासपण, इथला उपेक्षित वर्ग, इथले हत्ती-माकडं दाखवणार आहोत? ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात आधुनिक भारताचे राजकारण दाखवले आहे. शानदार दिग्दर्शक, शानदार निर्माता व अभिनेत्यांनी साकारलेला हा चित्रपट आहे. असे चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जायला हवेत, असे अनुपम खेर यांनी म्हटले होते.