ठळक मुद्देआयुष्यमानचा हा आगामी चित्रपट युवावस्थेत टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे.
आयुष्यमान खुराणा सध्या जोरात आहेत. आयुष्यमानचे अलीकडे आलेले ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरलेत. पण आयुष्यमानचा एक आगामी चित्रपट ‘बाला’ मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, कथा चोरल्याच्या आरोपाखाली आयुष्यमान तसेच ‘बाला’च्या दिग्दर्शक व निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
आयुष्यमानचा हा आगामी चित्रपट युवावस्थेत टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. पण सहाय्यक दिग्दर्शक कमल कांत चंद्रा यांनी ‘बाला’ची कथा चोरीची असल्याचा आरोप केला आहे. ‘बाला’चा लीड अॅक्टर आयुष्यमान खुराणा, निर्माता दिनेश विजन व दिग्दर्शक अमर कौशिक यांनी माझ्या ‘विग’ या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप कमल कांत यांनी केला आहे.
एका ताज्या मुलाखतीत कमल कांत यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती दिली. ‘बरेली की बर्फी’च्या शूटींगदरम्यान मी आयुष्यमानला भेटलो होतो. यावेळी मी आयुष्यमानला ‘विग’ ची कथा ऐकवली होती. आयुष्यमानला कथा आवडल्यानंतर या कथेचा सार मी त्याला व्हॉट्सअप केला. तो वाचून आयुष्यमानने मला भेटायलाही बोलवले. पण मी भेटायला गेल्यावर आयुष्यमान बिझी असल्याचे कारण मला सांगितले गेले. यानंतर अनेकदा मी आयुष्यमानकडे या कथेबद्दल पाठपुरावा केला. पण त्याने उत्तर देणे बंद केले. आता तो माझ्या या कथेवर आधारित चित्रपट घेऊन येतोय, असे त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर कमल कांतने आयुष्यमान, दिनेश विजान व अमर कौशिक यांना कायदेशीर नोटीस पाठवले. पण तिघांनीही या नोटीसकडे दुर्लक्ष केले. यानंतर कमल कांतने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, तिघांविरोधात प्रकरण दाखल केले.
यासंदर्भात ‘बाला’चे दिग्दर्शक अमर कौशिक यांना विचारले असता, मला याबद्दल काहीही ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या चार-पाच महिन्यांपासून आम्ही या कथेवर काम करतोय. दोन्ही कथांमधील पात्रांचे साम्य कदाचित योगायोग असवा. मी ना कमल कांत यांची स्क्रिप्ट ऐकली ना त्यांना कधी भेटलो. केसचे म्हणाल तर त्याला कसे उत्तर द्यायचे ते निर्माता ठरवेल, असे त्यांनी सांगितले.