बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा सर्वांचा आवडता अभिनेता. अक्षयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अक्षय प्रत्येक प्रकारच्या सिनेमांमध्ये कायमच जबरदस्त अभिनय करताना दिसतेय. पण गेल्या काही वर्षांपासून अक्षयचे सिनेमे ओळीने फ्लॉप झाले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या मनातली गोष्ट शेअर केलीय. याशिवाय सलग सिनेमे फ्लॉप झाल्याने अक्षयने मोठा निर्णय घेतलाय.
सिनेमे अयशस्वी होतात तेव्हा दुःख होतं: अक्षय कुमार
अक्षयने 'फोर्ब्स इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य केलंय. अक्षय म्हणाला, "प्रत्येक सिनेमामागे खूप कष्ट असतो. प्रचंड घाम गाळावा लागतो. कोणत्याही सिनेमाला अयशस्वी होताना पाहणं ही खूप दुःखदायी गोष्ट असते. आयुष्यात येणारं अपयश आपल्याला यशाचं महत्व देणारं असतं. येणाऱ्या अपयशामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. एखादा सिनेमा फ्लॉप होतो तेव्हा कलाकाराच्या आयुष्यावरही परिणाम होतो."
सिनेमे फ्लॉप होत असल्याने अक्षयने घेतला मोठा निर्णय
अक्षय कुमार पुढे म्हणतो, "तुमच्या कंट्रोलमध्ये काही नसतं. मेहनत करणं फक्त तुमच्या हातात असतं. मनोरंजन विश्व गेल्या काही काळापासून झपाट्याने बदलत आहे. प्रेक्षक आता सिनेमे बघत नाहीत. त्यामुळे एखादा प्रोजेक्ट जर खरंच एंटरटेनिंग असेल तर त्याच प्रोजेक्टमध्ये काम करावं लागतं. आता मी कंटेंटच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करेन. माझा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये येतील की नाही, याचा मी विचार करेन. यापुढे माझे सिनेमे प्रेक्षकांना फक्त मनोरंजन देणार नाहीत तर त्यांना कुठेतरी माझ्या सिनेमांसोबत कनेक्शन वाटेल, याचा मी विचार करेन." अक्षय लवकरच 'खेल खेल में' या आगामी सिनेमातून भेटीला येणार आहे. हा सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.