Actor Amol Palekar Hospitalized : 1970 व 80 चं दशक गाजवणारे आणि मनोरंजन विश्वात आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर (Amol Palekar ) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 77 वर्षीय अमोल पालेकरांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तथापि काळजीचं कारण नाही, अशी माहिती त्यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी ‘एबीपी न्यूज’ लादिली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आधीपेक्षा त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं त्यांनी सांगितलं. यापेक्षा अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला.एका दीर्घ आजारावरील उपचारासाठी अमोल पालेकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. 10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
1970 च्या दशकात ‘लार्जद दॅन लाईफ’ भूमिका साकारण्याकडे अनेक स्टार्सचा ओढा असताना अमोल पालेकरांनी मात्र पडद्यावर सामान्य माणसाच्या भूमिका स्वीकारल्या. केवळ साकारल्या नाहीत तर या भूमिकांना एक वेगळं वलय प्राप्त करून दिलं. त्यामुळेच आजही अमोल पालेकर म्हटलं की, प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर त्यांच्या त्याच भूमिका येतात.
अमोल पालेकर यांना कधीच अभिनेता बनायचं नव्हतं. पेंटिग, चित्रकला हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. ‘मी प्रशिक्षण घेऊन चित्रकार झालो, अपघाताने अभिनेता बनलो, अगतिकपोटी निर्माता बनलो आणि आवडीने दिग्दर्शक झालो,’ असं अमोल पालेकर नेहमीच म्हणतात.70 व 80 च्या दशकात रजनीगंधा, छोटी सी बात, नरम गरम, गोलमाल, चितचोर, श्रीमान श्रीमती, अनकही, रंगबिरंगी, सावन अशा अनेक सिनेमांत त्यांनी भूमिका साकारल्या. बाजीरावचा बेटा आणि शांतता! कोर्ट चालू आहे या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.