गेल्या 24 तासांत कोरोनामुळे देशात 3498 जणांचा बळी गेला आहे तर 3 लाखांवर नवे रूग्ण सापडले आहेत. ही स्थिती भयावह आहे. (coronavirus pandemic) लोक हतबल झाले आहेत. सुदैवाने मदतीला धावून जाणारे, माणुसकीला जपणारे काही लोक आपल्या अवतीभवती आहेत. अभिनेता अर्जुन गौडा त्यापैकीच एक. कन्नड अभिनेता अर्जुन गौडा (Arjun Gowda) या भीषण महामारीच्या काळात अॅम्बुलन्स ड्रायव्हर बनला आहे. गंभीर रूग्णांना रूग्णालयात पोहाचवून तर प्रसंगी मृतदेह घाटावर पोहोचवून तो माणुसकीचा धर्म जपतो आहे.
अर्जुनने Yuvarathnaa व Rustum अशा सिनेमात काम केले आहे. महामारीच्या या भीषण काळात प्रोजेक्ट स्माईल ट्रस्ट अंतर्गत अर्जुन पीपीई किट घालून दिवसरात्र लोकांना सेवा देत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून पीपीई किट घालून अर्जुन गरजूंना सेवा देत आहे.
अर्जुनने सांगितले, गेल्या काही दिवसांत मी एक डझनावर अधिक कोरोना संक्रमित रूग्णांवर अंतिमसंस्कार केला. मदत हवी असणा-या प्रत्येकापर्यंत पोहोचणे, याच एका हेतूने गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर आहे. लोकांचा धर्म न बघता, माणुसकीच्या नात्याने या कठीण काळात मी लोकांना मदत करतोय. आणखी काही महिने मी ही सेवा देत राहिल. माझ्या लोकांच्या मदतीसाठी मी खारीचा वाटा उचलू शकलो तर मला त्यात आनंद आहे, असे अर्जुनने सांगितले.
अर्जुनने स्वत: एक अॅम्बुलन्स घेतली आहे. जुजबी ट्रेनिंग घेऊन तो दिवसरात्र लोकांसाठी खपतो आहे. लोकांना सेवा देणे माझे कर्तव्य आहेत. कर्नाटकाच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळणे हा माझा गौरव आहे, असे त्याने म्हटले आहे. गरजूंपर्यंत ऑक्सिजन पोहोवण्याचीही त्याची तयारी आहे, असेही त्याने सांगितले.अर्जुनच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होतेय. सोशल मीडियावर त्याला अभिनंदनाचे, आभाराचे, कौतुकाचे हजारो संदेश येत आहेत.