बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अर्शद वारसीने आजवर विविध सिनेमांमधून आपलं मनोरंजन केलंय. 'लगे रहो मुन्नाभाई', 'गोलमाल', 'धमाल' अशा सिनेमांमधून अर्शदने आपल्याला खळखळून हसवलंय. अर्शदने नुकतंच समदीश भाटियाच्या मुलाखतीत अनेक विषयांवर मौन सोडलंय. या मुलाखतीत प्रभासच्या 'कल्कि २८९८ एडी'विषयी बोलताना अर्शदने मन मोकळं केलं. याशिवाय कोणतेही आढेवेढे न घेता 'कल्कि २८९८ एडी'बद्दलची नाराजी उघड व्यक्त केली.
अर्शद कल्कि २८९८ एडी बद्दल काय म्हणाला?
समदीशने अर्शदला विचारलं, शेवटचा कोणता वाईट सिनेमा पाहिलाय? त्यावेळी 'कल्कि २८९८ एडी' बद्दल बोलताना अर्शद म्हणाला की, "मला हा सिनेमा नाही आवडला. सॉरी प्रभास पण तो मला या सिनेमात जोकर वाटला. मला खूप वाईट वाटलं. मला मॅड मॅक्स सिनेमासारखं काहीतरी बघायला मिळेल याची अपेक्षा होती. मी तिथे मेल गिब्सनसारख्या कलाकाराला इमॅजिन करतोय. पण प्रभासने काहीतरी वेगळंच केलं. तो असं का करतो, मला खरंच कळत नाही."
अर्शदने केलं अमिताभ बच्चन यांचं कौतुक
'कल्कि २८९८ एडी' सिनेमाबद्दल बोलताना अर्शदने अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं. तो पुढे म्हणाला, "मला सिनेमा नाही आवडला. पण अमिताभ बच्चन हे सिनेमात किती कमाल दिसतात. त्यांच्यासारखी थोडी एनर्जी आपल्याला मिळाली तर आपलीही लाईफ सेट होईल." अर्शदने 'कल्कि २८९८ एडी'बद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. आधुनिक काळाचं महाभारताशी कनेक्शन जोडणाऱ्या 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला.