आपल्या दमदार अभिनयाने आणि आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. गेल्या दोन महिन्यांपासून इरफानची प्रकृती जरा जास्तच बिघडली होती. काल त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि इथेच उपचारादरम्यान इरफानने अखेरचा श्वास घेतला. इरफान सिनेजगताचा हिरो होता. पण करिअरच्या सुरुवातीला टीव्हीचा पडदाही त्याने गाजवला होता. बॉलिवूडआधी इरफान छोट्या पडद्याचा सुपरस्टार होता.
इरफानच्या अॅक्टिंग करिअरची सुरवात झाली तीच मुळी टीव्हीवरून. ‘श्रीकांत’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर भारत एक खोज, कहकशां, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात, चाणक्य, अंगूरी, स्पर्श आणि चंद्रकांता अशा अनेक गाजलेल्या व लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने काम केले.नीरजा गुलेरी यांच्या ‘चंद्रकांता’ या मालिकेत त्याने बद्रीनाथचे पात्र साकारले होते. बद्रीनाथशिवाय त्याचा जुळा भाऊ सोमनाथचीही भूमिका साकारली होती. या मालिकेने इरफानचे आयुष्य बदलले.
‘द ग्रेट मराठा’ या पानीपत युद्धावर आधारित मालिकेत इरफानने नकारात्मक भूमिका साकारली होती. लाल घास पर नील घोडे या दूरदर्शनवरील एका टेलिप्लेमध्ये इरफानने लेनिनची भूमिका साकारली होती. टीव्ही सीरिज ‘डर’मध्ये सायको किलरची भूमिका साकारली होती.
टीव्हीवरचे इरफानचे करिअर जोरात असताना मीरा नायरची नजर त्याच्यावर पडली आणि तिने ‘सलमा बॉम्बे’ या सिनेमाची आॅफर त्याला दिली. हा इरफानचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता.