26/11 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्वांनाच हादरवलं. अनेक लोकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं. सीएसएमटी स्टेशन, ताज हॉटेल, ओबेरॉय अशा अनेक ठिकाणी लोकांवर बेछूट गोळीबार झाला. १६६ पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. यातच अभिनेता आशिष चौधरीच्या (Ashish Chowdhary) बहिणीचाही मृत्यू झाला. आशिषने या हल्ल्यात बहीण आणि जीजू दोघांना गमावलं होतं.
'धमाल' फेम अभिनेता आशिष चौधरीची बहीण मोनिका छाबरिया आणि अजित छाबरिया यांचा दहतशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. ते दोघेही ट्रायडंट हॉटेलमधील टिफिन रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. याचवेळी दोन दहशतवाद्यांनी फायरिंग करायला सुरुवात केली. यामध्ये दोघांचा मृ्त्यू झाला. हल्ल्याची माहिती कळताच आशिष तिथे पोहोचला आणि दोन दिवस हॉटेलबाहेर उभा राहिला. दोन दिवसांनंतर त्याला बहीण आणि जीजूचा मृत्यू झाल्याचं कळलं.
आशिष एका मुलाखतीत म्हणाला, '26/11 च्या हल्ल्यानंतर मी ४० दिवस डिप्रेशनमध्ये होतो. तो काळ माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय वाईट काळ होता. बहिणीची दोन्ही मुलं कनिष्क आणि अनन्या आता माझ्याजवळच राहतात.'
आशिषला स्वत:ला एक मुलगा आणि जुळ्या मुली आहेत. त्याच्या पडत्या काळात पत्नीने त्याला साथ दिली. आशिषने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. मात्र त्याला वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. बहिणीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचं अपघाती निधन झालं. नंतर आशिषची पत्नी डिप्रेशनमध्ये गेली. आशिषवर आर्थिक संकटही कोसळलं होतं. त्याचं दिवाळं निघणार होतं. यावर मात करत तो पुन्हा उभा राहिला.