गेल्या काही दिवसांपासून अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच त्यांचा सिर्फ एक बंदा काफी हैं हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात त्यांनी केलेल्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. या सिनेमामध्ये त्याने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे ही भूमिका गाजल्यानंतर त्याच्याविषयी एक नवीन चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी मनोज बाजपेयी वोडकाचा एक शॉट घेतो असं म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता अभिनेत्याने स्पष्टीकरण दिलं आहे.
अलिकडेच मनोजने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. "ज्यावेळी मी सिनेमाचं शूट करत होतो त्यावेळी एका ज्युनिअर मुलीने मला विचारलं, 'सर तुम्ही हे काय पिताय?' त्यावर हे औषध आहे असं मी सांगितलं. त्यावर आमच्या कलाकारांच्या ग्रुपमध्ये अशी अफवा आहे की, तुम्ही प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी वोडकाचा एक शॉट घेता, असं या मुलीने सांगितल्याचं", मनोज बाजपेयी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मुर्खांनो, मी मेहनत करतो हे तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही सगळ्यांनी होमिओपॅथी औषधांना वोडका शॉट करुन ठेवलं. अभिनयाचं रहस्य वोडका कसं काय असू शकतं."
दरम्यान, या किस्स्यासोबतच त्यांच्या मानधनाचाही एक किस्सा रंगला होता. मात्र, त्याचंही त्यांनी चपखल उत्तर दिलं. या सिनेमाप्रमाणेच त्यांची द फॅमिली मॅन ही वेब सीरिजही गाजली.