प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार कायम येत असतात. त्यामुळे कधी रावाचा रंक होईल आणि रंकाचा राव हे सांगता येत नाही. सध्या एका लोकप्रिय अभिनेत्याच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. एकेकाळी सिनेसृष्टीवर राज्य करणारा हा अभिनेता आज लोकांच्या गाड्या दुरुस्त करत आहे. या अभिनेत्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील अभिनेता अब्बास (mirza abbas ali ) साऱ्यांच्या लक्षात असेल. अभिनेता असण्यासोबतच मॉडलिंग विश्वातही त्याने त्याचा दबदबा निर्माण केला होता. परंतु, कलाविश्वातून काढता पाय घेतल्यानंतर त्याच्यावर थेट मेकॅनिक होण्याची वेळ आली.
अब्बासने १९९६ मध्ये कादल देशम या सिनेमातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. अब्साने प्रामुख्याने तामिळ आणि तेलुगू सिनेमात काम केलं. परंतु, मल्याळम, हिंदी आणि कन्नड सिनेमांमध्येही त्याचा वावर होता. परंतु, कलाविश्वातून बाहेर पडत त्याने न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे इथेच तो मेकॅनिक म्हणून काम करतो.
एकेकाळी तामिळ सिनेमांचा मोठा स्टार म्हणून ओळखला जाणार अब्बास एका पेट्रोल पंपावर काम करतोय. याविषयी त्याने त्याचं मतही व्यक्त केलं. 'जर एखाद्या अभिनेत्याने भारतात इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला तर तो काय करतोय, कुठे काम करतो हे पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण इथे न्यूझिलंडमध्ये पाहायला कोणी नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र आहे,' असं अब्बास म्हणाला.
दरम्यान, मेकॅनिकचं काम करण्यापूर्वी त्याने एका बांधकाम साईटवरही काम केलं होतं. विशेष म्हणजे आर्थिक संकटाच्या काळात त्याने अनेक वेळा आत्महत्येचा विचारही केला होता. परंतु, यातून बाहेर येत त्याने आत्महत्या करणाऱ्या मुलांना कसं रोखायचं याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊनपब्लिक स्पीकिंग सर्टिफिकेशन कोर्स केला.