भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्वाचा सिनेमा म्हणजे 'तुंबाड'. हा सिनेमा आजही पाहिला की धडकी भरते. 'तुंबाड' सिनेमा भारतीय मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय सिनेमा म्हणून ओळखला जातो. भयपटांच्या रांगेत 'तुंबाड' कायम वरच्या स्थानावर असेल यात शंका नाही. हा सिनेमा १३ सप्टेंबरला पुन्हा रिलीज झालाय. 'तुंबाड'मध्ये प्रमुख भूमिका साकारली ती अभिनेता सोहम शाहने. सोहमनेच 'तुंबाड'च्या निर्मितीचं शिवधनुष्य उचललं. पण हा अनुभव किती कष्टदायी होता, याची कहाणी सोहमने उलगडली आहे.
सोहम शाहला 'तुंबाड' दरम्यान अश्रू अनावर का झाले?
बिअरबायसेप्सला दिलेल्या मुलाखतीत सोहम याविषयी म्हणाला की, "मी या सिनेमादरम्यान खूप थकलो होतो. अजय-अतुल सिनेमासाठी एक गाणं बनवत होते. मी त्यांच्याबाजूला बसलो होतो. आमच्यात काहीतरी संभाषण सुरु होतं आणि अचानक माझे डोळे पाण्याने डबडबले. मला अश्रू अनावर झाले होते. मी तेव्हा शपथ घेतली होती की, पुन्हा कोणताही सिनेमा प्रोड्यूस करणार नाही. मी खूप थकलो होतो. वारंवार कोणाला तरी भेटायचं, सिनेमाची कल्पना सांगायची. या सर्व प्रोसेसमध्ये मी इतका थकलेलो की मला रडू कोसळलं. पण सिनेमा झाला. यानंतरही मी निर्मिती करत राहिलो. कुठे थांबलो नाही.
तुंबाड २ लवकरच येणार
'तुंबाड' सिनेमा पुन्हा प्रदर्शित करताच सिनेमाच्या मेकर्सने एक मोठी घोषणा केली आहे. 'तुंबाड' सिनेमानंतर त्याच्या सीक्वलची मागणी चाहत्यांकडून होत होती. आता मेकर्सने चाहत्यांना सरप्राइज देत 'तुंबाड २' ची घोषणा केली आहे. 'तुंबाड' सिनेमाच्या शेवटी त्याच्या सीक्वलाबाबत हिंट देण्यात आली आहे. 'तुंबाड २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ६ वर्षांनी तुंबाडचा सीक्वल येणार असल्याने चाहतेही आनंदी आहेत.