हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांना सुरुवातील प्रचंड यश मिळतं. यशशिखरावर असतानाच अचानक गायबही होतात. चंदेरी दुनियेपासून दूर जात गायब होतात. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्ज' सिनेमात ऋषी कपूर यांच्यासह आणखी एका अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर अचानक तो गायब झाला. पुन्हा कधीच रुपेरी पडद्यावर झळकला नाही. तो अभिनेता होता राज किरण . गेल्या दोन दशकापासून तो गायब आहे. तो आज काय करतो, कुठे राहतो त्याच्याबद्दल काहीच कोणाला माहिती नाही. विशेष म्हणजे राज किरण कोणत्या स्थितीत आहे हे त्याच्या कुटुंबियांनाही माहिती नाही. एवढेच नाही तर राज किरण जिवंत आहे की नाही हे कोणालाही माहिती नाही.
अनेकांनी तर राज किरण आता या जगात नाही असेही म्हटले होते. पण काही वर्षांपूर्वी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांचा शोध घेतला आणि ते अटलांटा येथील मनोरुग्णालयातच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अटलांटा येथील मनोरुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले गेले. मात्र राज किरण यांचे कुटुंबाने माहिती चुकीची असल्याचे म्हटले होते.समोर आलेल्या माहितीवर कुटुंबाने बातमीत सत्यता नसल्याचे स्पष्ट केले होते.
आपल्या छोट्याशा कारकिर्दीत राज किरण यांनी 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 1982 साली स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्यासोबत 'अर्थ' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. 1980 मध्ये 'कर्ज' या चित्रपटात ऋषी कपूर आणि 1988 मध्ये 'एक नया रिश्ता' या चित्रपटात रेखासोबत त्यांनी काम केले. 1994 मध्ये आलेल्या 'वारिस' या चित्रपटात आणि शेखर सुमनच्या 'रिपोर्टर' या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. 2003 पासून राज किरण बेपत्ताच आहेत.