Join us  

पुष्पा, आय हेट टीअर्स ! डायलॉगची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 7:40 AM

सलग १७ हिट चित्रपट देण्याची किमया त्यांनीच साधली होती.

- संजीव पाध्ये 

या चित्रपटांमधील गाणी जशी वर्षांनुवर्षे ताजी राहिली आहेत, तसेच काही डायलॉगसुद्धा ! ‘अमर प्रेम’मधील “पुष्पा.. आय हेट टीअर्स” हा डायलॉग आज ५१ वर्षांनंतरसुद्धा रसिक विसरलेले नाहीत. सुपरस्टार राजेश खन्नाने हा डायलॉग गलबलून म्हटला होता. आज याची आठवण यासाठी की, १८ जुलैला राजेश खन्ना ऊर्फ काकाजीला जाऊन दहा वर्षे होताहेत. त्यांच्या एवढी अफाट लोकप्रियता दुसऱ्या कुणालाही मिळाली नाही. सलग १७ हिट चित्रपट देण्याची किमया त्यांनीच साधली होती. त्यांच्या तोंडची बहुतेक गाणी आणि काही संवाद हे अमर झालेत. 

सफर, आनंद, कटी पतंग आणि अमर प्रेममधील संवाद जिंदगी म्हणजे आयुष्य कसे जगावे याच्याबद्दल काहीसे तत्त्वज्ञान सांगणारे होते. हा जो ‘आय हेट...’ डायलॉग आहे. त्याच्या मागे एक कहाणी आहे, किस्सा आहे. अमर प्रेम हा विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या हिंगेरी कोचोरी या मूळ कथेवर आणि त्यानंतर त्यावर निघालेल्या निशी पद्म या बंगाली चित्रपटावर आधारित होता. या विभूतींनी अनेक वर्षे विधुर असल्याने कोलकाताच्या रेड लाइट भागात काढली होती. तिथेच त्यांना पुष्पा आणि अनंग बाबू भेटले होते. त्यांची कथा त्यांनी लिहिली आणि त्यांच्या बहुतेक कथांवर चित्रपट निघाले तसा निशी पद्म आणि पुढे अमर प्रेम निघाला. पुष्पा गणिका आहे आणि तिला भेटायला रोज एक आनंद बाबू येत असतो. अमर प्रेमसाठी अनंगचा आनंद करण्यात आला होता. तो एका प्रसंगात तिचे दुःख पाहून आणि डोळ्यातले अश्रू पाहून गलबलून म्हणतो, “पुष्पा मला हे अश्रू बिलकुल पसंत नाहीत. मला त्यांचा तिटकारा आहे.” यातून त्याने एक तत्त्वज्ञानच सांगितले आहे, कितीही दुःख असले तरी रडत बसू नका, त्यावर मात करायला पाहा. लोक दोन्हीकडून बोलणारी असतात. त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. 

या प्रसंगानंतर लगेच “कुछ तो लोग कहेंगे”, गाणे येते. गंमत अशी आहे की, जेव्हा बंगाली चित्रपट घेऊन हा चित्रपट तयार केला जात होता. तेव्हा दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी अरविंद मुखर्जी यांनी बंगालीत लिहिलेले संवाद रमेश पंत यांना हिंदीत लिहून देण्याची जबाबदारी दिली होती. पंत यांना आधीच इंग्लिशमध्ये असलेला ‘आय हेट टीअर्स’, हा डायलॉग तसाच ठेवावा असे वाटले होते. उलट त्यात उत्कटता येते, असे त्यांना वाटले होते. त्यांचा हा निर्णय अचूक ठरला. हा डायलॉग राजेश खन्नाने अतिशय उत्कटतेने म्हटला. त्यामुळे या चित्रपटाचा तो जणू गाभा ठरला आणि रसिकांनाही भावला. पंत यांना त्यावेळचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. राजेश खन्नाच्या अभिनयाने तेव्हा तरुणीच आकर्षित झाल्या होत्या असे नव्हे, तर त्याबाबतचे अनेक किस्से सांगितले जातात. वयाने लहान थोर सगळे आकर्षित झाले होते. 

राजेश खन्नाची लोकप्रियता कमालीची होती, यात शंका नाही. पण तरीसुद्धा नसिरुद्दीन शाहसारख्या काहींनी तो सुमार अभिनेता होता आणि त्याच्या चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटांचा दर्जा घसरला, अशी टीका केली. आता त्याच्या या संवादबाजीची टिंगल केली जाते. पण खरं तर हा द्वेष आहे. त्याच्याएवढे आपण लोकप्रिय होऊ शकलो नाही या नैराश्यातून होणाऱ्या या गोष्टी आहेत, असो. असा सुपरस्टार झाला नाही आणि पुन्हा होणार नाही. हे वास्तव आहे, म्हणून त्याचे संवादसुद्धा ५० वर्षांनंतर ताजे राहिले.

टॅग्स :राजेश खन्ना