'बाहुबली' फेम अभिनेता राणा दग्गुबती यानं तिरुपती बालाजी मंदिरात त्याच्या एका चाहत्याचा मोबाइल हिसकावून घेतला. आपल्या आगामी चित्रपटासाठीच्या चित्रीकरणातून वेळ काढून आणि भविष्यातील आपल्या प्रोजेक्टला यश मिळावं याची प्रार्थना करण्यासाठी अभिनेता राणा दग्गुबतीनं नुकतीच तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पण यावेळी त्याच्यासोबत घडलेल्या एका प्रकाराची सोशल मीडियात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. राणा दग्गुबतीनं तिरुपती मंदिरात त्याच्यासोबत सेल्फी टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याचा मोबाइल हिसकावून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
राणा दग्गुबती मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं कळताच त्याच्याभोवती चाहत्यांची गर्दी करण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक जण मोबाइल कॅमेरात त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत होता. तर एका चाहत्यानं त्याच्याजवळ जाऊन सेल्फी टिपण्याचा प्रयत्न केला. पण राणा दग्गुबतीला ते आवडलं नाही. त्यानं लगेच चाहत्याचा मोबाइल हिसकावून घेत आपली नाराजी व्यक्त केली. दग्गुबतीनं शांतपणे चाहत्याला मंदिर ही सेल्फी टिपण्याची जागा नव्हे, असं सांगत आपलं मत व्यक्त केलं आणि सेल्फीला नकार दिला.
दग्गुबती सोशल मीडियात नेहमीच चर्चेतराणा डग्गुबतीने नुकतंच सोशल मीडियावरून काही काळ दूर राहण्याची घोषणा करत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या सर्व पोस्ट हटवल्या होत्या. त्यामुळे याची प्रचंड चर्चा देखील झाली. व्हर्च्युअल जगापासून दूर गेल्यानं त्यानं त्याच्या चाहत्यांना निराश केलं. पण त्यानं चाहत्यांना आश्वासन दिलं की तो नक्कीच जास्तीत जास्त काम करुन आनंद देईल.
राणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्याचं कोरोनाच्या काळात मिहिका बजाजशी लग्न केलं. त्याच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. दग्गुबती नेहमीच त्याच्या वैयक्तिक आणि खासगी गोष्टी गुप्त ठेवणं पसंत करतो.