मुंबई-
बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र त्याच्या सुरक्षा रक्षकाला सापडलं आहे. त्यामुळे बॉलीवूड आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खान याचे वडील आणि ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक सलीम खान यांच्या बॉडीगार्डला हे पत्र सापडलं आहे. महत्वाची बाब म्हणजे सलमान खान जिथं मॉर्निंग वॉकला जातो आणि विश्रांतीसाठी थांबतो त्याच ठिकाणी धमकीचं पत्र सापडलं आहे. संबंधित पत्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं असून वांद्रे पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच पत्र लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, नेमकं कारण काय? वाचा...
"सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला एका जागेवर एक पत्र सापडलं आहे. सलमान आणि सलीम खान ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जातात व ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतो अशा एका बेंचवर एक पत्र सापडलं आहे. त्यात जीवे मारण्याची धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्रात सलमान खान आणि सलीम खान या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "मूसावाला जैसा कर दूंगा", अशा आशयाचं पत्र आहे. पोलीस आता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पत्र कुणी ठेवलं याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सुरक्षा वाढवलीसलमान आणि सलीम खान यांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. तसंच तपासाचीही सुत्रे वेगानं फिरू लागली आहे. सिद्धू मुसेवाला या पंजाबी गायकाची नुकतंच अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार तुरुंगात आहे. पण याच ठिकाणाहून तो आपली गँग ऑपरेट करतो असं म्हटलं जातं. याच लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.
'सलमान खानला मारणार...', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पोलीस कोठडीत दिली धमकी; व्हिडिओ व्हायरल
२०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचं कारण होतं सलमान खानचं काळविट शिकार प्रकरण. कारण गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळेच त्याने सलमान खानला काळविट शिकार प्रकरणावरुन थेट जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली होती. सलमान खानला जीवे मारण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीने प्लानिंग केलं होतं. 'रेडी' सिनेमाच्या शूटिंगवेळी लॉरेन्सने सलमान खानवर हल्ला करण्याचं प्लानिंग केलं होतं. पण त्यावेळी लॉरेन्स बिश्नोईला त्याच्या आवडीचं शस्त्र मिळालं नव्हतं. त्यामुळे हत्येचं प्लानिंग पूर्ण होऊ शकलं नव्हतं.
सिद्धू मुसेवाला प्रकरणानंतरच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पण त्यानंतर आता थेट धमकीचं पत्र सापडल्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.