Actor Sayaji Shinde Video : सिने अभिनेते, निसर्गप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सिनेमातील खलनायक ते खऱ्या आयुष्यातील नायक इथपर्यंतचा त्यांचा प्रवास उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. 10 लाखांवर वृक्षारोप करणारे आणि देवराईला जनमानसात पोहोचवणारे हेच सयाजी शिंदे सध्या मात्र संतापलेले आहेत. मुंबईतील सायन रुग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजताच सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयात (Sion Hospital ) तब्बल १५८ झाडे तोडण्यात येणार आहेत. रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण समजताच अभिनेते सयाजी शिंदे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत, याला विरोध नोंदवला आहे.
‘ज्या रूग्णालयात जीव वाचवले जातात तिथं १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत,’ असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘अत्यंत वाईट बातमी आहे की सायन रुग्णालयात डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी १५८ झाडे कापण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील दोन झाडे कापण्यात आली आहेत. इतर झाडांवर नंबर पडले आहे. एखाद्या यमाने किंवा दहशतवाद्याने सांगावं की ही १५८ माणसं आम्ही मारणार आहोत, तसं या झाडांवर बॉम्ब टाकल्यासारखं होणार आहे. त्या झाडावर असणार पशूपक्षींचा संसार नष्ट होणार आहे. ही परवानगी का दिली? ही वृक्षतोड टाळता येऊ शकते का? ही झाडं वाचू शकतात का? याचा लगेच विचार व्हायला हवा. कारण करोनाकाळात आपण विकत ऑक्सिजन घेतला तसा सिलेंडरनेच ऑक्सिजन घ्यायचा का? चांगली झाडं जी कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन देतात, पशू पक्षांची घरं असलेली ती झाडं का कापायची? कृपया ती झाडे वाचवा,’ असं त्यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.