"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:10 PM2024-11-30T16:10:21+5:302024-11-30T16:11:40+5:30
पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
मनोरंजनसृष्टीत अनेक अभिनेत्यांवर विनयभंगाचे, बलात्काराचे आरोप आहेत. त्यातच आता 'जोश','लक्ष्य' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दिसलेला अभिनेता शरद कपूर सध्या चर्चेत आला आहे. एका महिलेने त्याच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. ३२ वर्षीय महिलेने शरद कपूरविरोधात (Sharad Kapoor) खार पोलिसात रितसर तक्रारही दाखल केली आहे. आता या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
संबंधित महिलेने तक्रार करताना सविस्तर सांगितले की, "शरद कपूरने मला त्याच्या घरी बोलावलं होतं. त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न केला. माझी आणि शरद कपूरची फेसबुकवरुन ओळख झाली होती. नंतर आम्ही व्हिडिओ कॉलवरही बोललो होतो. शूटिंग संबंधी कामाविषयी बोलायचं असल्याने त्याने मला भेटायला बोलवलं होतं. त्याने मला लोकेशन पाठवलं. खार मधलं ते त्याचं ऑफिस आहे असं त्याने सांगितलं. मात्र तिथे गेल्यावर कळलं की ते तर त्याचं घर आहे."
ती पुढे म्हणाली,"अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर मी पोहोचले तर एकाने दरवाजा उघडला. आतमधून शरदने आवाज देत बेडरुममध्ये येण्यास सांगितलं. तो तिथे कपडे न घालता बसला होता. मी त्याला कपडे घालून मग माझ्याशी बोला असं सांगितलं. तर त्याने मला मागून पकडलं आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला लागला. मी त्याच क्षणी त्याला ढकलून तिथून पळ काढला. त्याने संध्याकाळी व्हॉट्सअॅपवरुन मला अश्लील मेसेजही पाठवले."
महिलेने ही सर्व घटना तिच्या मित्राला सांगितली. यानंतर तिने खार पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. अद्याप याप्रकरणी शरद कपूरची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शरद कपूरविरोधात आयपीसी कलम ७४, ७५ आणि ७९ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.