दीपिका पदुकोण (deepika padukone) आणि शाहरुख खान (shahrukh khan) यांची मुख्य भूमिका असलेला 'ओम शांती ओम' (om shanti om) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. ९ नोव्हेंबर २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सुपरहिट ठरलेल्या या सिनेमामध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade)यानेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे शाहरुखच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या श्रेयसला या सिनेमाच्या सेटवर एक चांगलाच धडा मिळाला. याविषयी एका मुलाखतीत श्रेयसने भाष्य केलं आहे.
अलिकडेच श्रेयसने 'मॅशेबल इंडिया'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये 'ओम शांती ओम'च्या सेटवर शाहरुने सगळ्यांसमोर एक मोठा धडा दिल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे त्याने दिलेल्या धड्यामुळे आयुष्यात एक महत्त्वाची शिस्त लागली असंही त्याने आवर्जून सांगितलं.
"ओम शांती ओममध्ये रात्रीचा एक सीन होता. या सीनचं साधारणपणे सात वाजता शूट करायचं होतं. या शूटनंतर मला दुसऱ्या प्रोजेक्टच्या शूटसाठी रात्री २ वाजता बँकॉकला जायचं होतं. मात्र, त्या दिवशी शाहरुख नेमका लेट आला. त्याने सेटवर यायला साडेआठ वाजवले. यामुळे आमची दिग्दर्शिका फराह खानदेखील चांगलीच संतापली होती. यावरुन तिने शाहरुखला झापलंदेखील. 'श्रेयसला २ वाजता विमानतळावर पोहोचायचं आहे', तिने त्याला सांगितलं, असं श्रेयस म्हणाला.
पुढे तो म्हणतो, ''हा सीन आजच पूर्ण होईल', असं आश्वासन शाहरुखने फराहला दिलं. विशेष म्हणजे त्या दिवशी शाहरुख त्याच्या मेकअप रूममध्ये न जाता त्याने थेट शूटिंगला सुरुवात केली. विशेष म्हणजे हा सीन त्याने २ ऐवजी चक्क दीड वाजेपर्यंत शूट केला. शूट संपल्यावर 'अजून अर्धा तास बाकी आहे, 'आता काय करशील?' असा प्रश्न शाहरुखने मला विचारला. त्यावर, 'आता सरळ विमानतळावर जाईन', असं मी सांगितलं. यावर 'मला वाटलं तू तुझ्या कुटुंबासोबत वेळ घालवशील त्यामुळे मी सीन लवकर शूट केला'', असं तो म्हणाला.
"त्यावेळी माझी बायको दिप्ती मला विमानतळावर सोडायला येणार असल्याने ती सेटवर आली होती. पुढे शाहरुख म्हणाला होता, “थोडा वेळ आहे तर दिप्तीला कुठेतरी घेऊन जा तिच्यासोबत थोडा वेळ घालव. मी सुद्धा असेच करतो. गौरी आणि माझी मुलं सेटवर येतात. मग आम्ही काही वेळ एकमेकांसोबत घालवतो. थोड्या वेळाने ते घरी जातात आणि मी माझ्या पुढल्या शूटसाठी निघतो.”
दरम्यान, शाहरुखने दिलेल्या मौल्यवान सल्ल्यानंतर श्रेयस दिप्तीसाठी थोडा वेळ बाहेर फिरला आणि त्यानंतर तो बँकॉकच्या शूटसाठी पुढे रवाना झाला.