सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला लागला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात काही अभिनेते देखील उतरले आहेत. पंजाबचा पुत्र सनी देओल देखील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. अभिनेता सनी देओल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची बातमी अनेक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षाकडून मुंबईत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता तिच्या नंतर सनीच्या नावाची चर्चा आहे. सनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. पंजाबच्या गुरूदासपूर मतदार संघातून गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते विनोद खन्ना निवडणूक लढवत होते. ते 1997, 1999, 2004 आणि 2014 मध्ये या तिकिटावर निवडून देखील आले होते. पण 2017 ला त्यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुनील जाखड अनेक मतांच्या फरकांनी निवडून आले होते. त्यामुळे आता ही सीट खेचून आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, पंजाबच्या गुरूदासपूर याच मतदार संघातून सनीला निवडणूकीला उभे करण्याचा भाजपचा विचार सुरू आहे. पण निवडणूक लढवण्यासाठी सनी फारसा उत्सुक नाहीये. त्यामुळे सनीला उमेदवारीसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे या वृत्तात म्हटले गेले आहे.
आता सनी निवडणूक लढवणार की नाही हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल. सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी मथुरा येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.
सनी देओलने बेताब या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आजवर डर, बॉर्डर, गदर एक प्रेम कथा, दामिनी, त्रिदेव, चालबाज, घायल यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉक्स ऑफिसला दिले आहेत. आता सनी त्याचा मुलगा करण देओलला पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे लाँच करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तो स्वतः करत असून या प्रोजेक्टवर सध्या तो काम करत आहे.