Join us

'अलार्म काका' म्हणून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 3:49 PM

दिवाळी जवळ आली की टेलिव्हिजनवर ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ ही जाहिरात न चुकता पाहायला मिळते.

दिवाळी जवळ आली की टेलिव्हिजनवर ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ ही जाहिरात न चुकता पाहायला मिळते. या जाहिरातीला प्रेक्षकांची पसंतीदेखील खूप मिळते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सर्वांना उठवणारे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. काल म्हणजेच २० सप्टेंबरला वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली आहे. विद्याधर करमरकर हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक जाहिराती साकारल्या आहेत. विद्याधर करमरकर यांना सगळेजण आबा म्हणून ओळखले जात होते.

विद्याधर करमरकर मुंबईतील विलेपार्ले येथे वास्तव्याला होते. सुरुवातीच्या काळात नोकरी करून त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली होती. विविध  कार्यक्रमात ते नेहमी सहभागी व्हायचे. त्यात अनेक नाटकांचे सादरीकरण त्यांनी केले होते तर कधी दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती.

कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जीया , सास बहु और सेन्सेक्स, लंच बॉक्स ,एक थी डायन, एक व्हिलन यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी कधी वडील तर कधी आजोबांच्या भूमिका केल्या आहेत. जाहिरातीत देखील त्यांनी काम केले आहे.यात मोती साबण, इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट या जाहिरातींचा समावेश आहे.

वयाच्या नव्वदीतही ते तरूणांना लाजवतील असे एक्टिव्ह होते. एकदा चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ते आजारी पडले होते त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या कामाला प्राधान्य दिले आणि शूटिंग पूर्ण करण्यावर अधिक भर दिला होता.