गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहतावर्ग झपाट्याने वाढला आहे. फक्त दक्षिण नाही, तर उत्तर भारतामध्येही साउथ सिनेमांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि अभिनेते भव्य-दिव्य विषय पडद्यावर मांडत आहेत, ज्यामुळे ही क्रेझ वाढली आहे. दरम्यान, तामिळ अभिनेता चियान विक्रम असाच एक चित्रपट घेऊन येत आहे.
अलीकडेच मणिरत्नम यांच्या ऐतिहासिक 'पोनियिन सेल्वन' चित्रपटातून विक्रमने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता विक्रम पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. विक्रमचा मोस्ट अवेटेड 'सूर्यपुत्र कर्ण' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यूट्यूबवर अवघ्या काही तासांतच व्हिडिओला लाखो व्हू मिळाले आहेत.
मल्याळम चित्रपट दिग्दर्शक आरएस विमल यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी 'सूर्यपुत्र कर्ण' चा टीझर रिलीज केला आहे. महाभारतावर आधारित या चित्रपटाची निर्मिती गेल्या पाच वर्षांपासून रखडली होती. आता या चित्रपटाचा टीझर पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. विक्रमची झलक पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.
टीझरमध्ये युद्धचे दृष्य दिसत आहे. यात आवाढव्य आकाराचे रथ आणि विविध शस्त्रेही दिसत आहेत. तसेच, पायदळ, घोडदळ आणि हत्तींना लढताना दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात विक्रम अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट थ्रीडीमध्ये पाहता येणार आहे. हा आरएस विमल यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट असेल. या चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये असू शकते.