गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनात अडकले. त्यानंतर नुकतीच मौनी रॉय लग्नगाठ बांधली आणि आता चाहत्यांचा लाडका अभिनेता विक्रांत मेस्सी ( Vikrant Massey ) हाही लग्नबंधनात अडकला आहे. होय, काल व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर विक्रांतने त्याची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शीतल ठाकूर (Sheetal Thakur) हिच्यासोबत गुपचूप लग्न उरकलं. ‘छपाक’ फेम विक्रम मेस्सीनं गुपचूप लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत व शीतलल यांनी वर्सोवा येथील आपल्या घरी गुपचूप नोंदणी विवाह केला. या लग्नाला केवळ दोघांचे कुटुंबीय व जवळचे काही मित्र एवढेच हजर होते. मात्र, अद्याप या वृत्तांवर अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विक्रांत व शीतलने 2019 मध्ये साखरपुडा केला होता. दोघंही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनाही लग्न करायचं होतं. पण कोरोना महामारीमुळे त्यांचं लग्न अनेकदा लांबणीवर पडलं होतं. लग्नाचा मुहूर्त अनेकदा पुढे ढकलला गेल्यानंतर दोघांनी इंटिमेंट वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. नुकताच विक्रांत शीतलसोबत नव्या घरात शिफ्ट झाला आहे. या गृहप्रवेशाचे फोटो विक्रांतने सोशल मीडियावर शेअर केले होते.
जून 2020 मध्ये, विक्रांतने शीतलसाठी एक भावुक करणारी पोस्ट लिहिली होती. शिवाय शीतल ठाकूरसोबतच्या नात्यावरही शिक्कामोर्तब केलं होतं. विक्रांत व शीतल ठाकूर यांनी ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’च्या पहिल्या सीझनमध्ये एकत्र काम केलं होतं. याचदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
कामाबद्दल बोलायचं झालं तर, विक्रांत लवकरच सान्या मल्होत्रासोबत ‘लव्ह हॉस्टेल’मध्ये दिसणार आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून त्याचा ट्रेलर कालच प्रदर्शित झाला. विक्रांतने 2013 मध्ये लुटेरा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. विक्रांतने यापूर्वी दिल धडकने दो, लिपस्टिक अंडर माय बुरखा, अ डेथ इन द गंज, छपाक या चित्रपटात काम केलं आहे.