The Kerala Story : "15 दिवस सतत तिच्यावर अत्याचार, याचा पुरावा..." सिनेमाच्या वादावर अदा शर्मा स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:04 PM2023-05-18T12:04:52+5:302023-05-18T12:05:46+5:30
१५ जणांनी लैंगिक शोषण केल्यावर मला सांगा तुम्ही याचा पुरावा कसा द्याल.
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमाचा सध्या चर्चेत आहे. केरळच्या हजारो मुली लव्हजिहादला बळी पडून ISIS ला सामील होतात अशा सत्यघटनेवर कथा आधारित आहे. अनेकांनी हा चित्रपट प्रोपोगंडा असल्याचा आरोप केला. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये तर सिनेमावरच बंदी घालण्यात आली. चित्रपटाच्या टीमने नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्य अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) आपल्या भावना व्यक्त केल्या.
पत्रकार परिषदेत अदा शर्मा म्हणाली, "१५ जणांनी लैंगिक शोषण केल्यावर मला सांगा तुम्ही याचा पुरावा कसा द्याल. एका महिन्यात १५ जणांनी रोज वाईट कृत्य केलं असेल तर तुम्ही हे सिद्ध कसे कराल? शालिनीला (सिनेमातील अदाचं पात्र) प्रेमात धोका मिळाला. ती हे कसं सिद्ध करेल? मला नाही माहित या केस कशा रजिस्टर करण्यात येतील. मग या केसेस अशाच दाबून राहणार का. जिचं लैंगिक शोषण झालंय ते समोर येणारंच नाही कारण ती ते लिहून सिद्ध करु शकत नाही."
त्या मुली खरोखरंच धाडसी
अदा म्हणाली, "मी त्या मुलींना भेटले ज्यांच्यासोबत हे कृत्य झालं आहे. त्या सर्वच जणी खूप धाडसी आहेत. त्यांना चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे. त्यांना कसेही उलट प्रश्न विचारण्यात येतील हे माहित असताना त्या इथे सर्वांसमोर आल्या आहेत. त्यांचं धाडसाचं खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे."