एअर हॉस्टेसची नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमवण्यासाठी आलेली अभिनेत्री हर्षदा पाटीलने 'शूर आम्ही सरदार' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतूक केले. त्यानंतर तिने अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री केली. तसेच ती जाहिरात व काही गाण्यात झळकली आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता हर्षदा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. ती तेलगू चित्रपट 'मैत्रीवनम'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'मैत्रीवनम' हा चित्रपट सायन्स फिक्शनवर आधारीत असून दोन बेस्ट फ्रेंड्सवर भाष्य करतो. या चित्रपटाबाबत हर्षदा म्हणाली की, 'या चित्रपटाचा माझा अनुभव अप्रतिम होता. मी या सिनेमाबाबत खूप उत्सुक आहे. यात मी नंदिनी नामक साध्या मुलीची भूमिका साकारली आहे. ती लकी नामक मुलाच्या प्रेमात पडते. ती त्याला त्याच्या आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी प्रेरणा देते.''मैत्रीवनम' सिनेमातील तेलगू शब्दांचे उच्चार समजून घेणे ही सर्वात आव्हानात्मक बाब असल्याचे हर्षदाने सांगितले व पुढे म्हणाली की, 'मला तेलगू वाक्यांचे अर्थ समजून घ्यावे लागले आणि त्यानंतर त्यात माझ्या भावना व हावभाव अॅड करून अभिनय केला. तसेच या चित्रपटातील माझे लिपसिंग डबिंगशी मॅच होणे गरजेचे होते. त्यामुळे हा खूप छान अनुभव होता. ''मैत्रीवनम' या चित्रपटात हर्षदा सोबत अभिनेता विश्वा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.