श्वेता पांडे
‘आई-मुलाच्या नात्यावर आत्तापर्यंत अनेक चित्रपट आले अन् गेले. पण, ‘हेलिकॉप्टर ईला’ची तर बातच न्यारी आहे. आई-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारे हे चित्रपटाचे कथानक नक्कीच प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार,’ असे मुलाखतीत अभिनेत्री काजोल हिने सांगितले. प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘हेलीकॉप्टर ईला’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री काजोल ही आईच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी साधलेला हा संवाद....
* ‘हेलिकॉप्टर ईला’ चित्रपटाच्या आगळयावेगळया शीर्षकाबद्दल काय सांगशील?- होय. खरंतर ‘हेलिकॉप्टर मॉम’ ही नवी कन्सेप्ट सोशल मीडियावर हिट ठरली. ज्या आई त्यांच्या मुलांवर कायम प्रत्येक छोटया गोष्टीसाठी लक्ष ठेवून असतात, अशा आईसाठी ही नवी कन्सेप्ट उदयास आली. ओव्हर पझेसिव्ह, ओव्हर प्रोटेक्टिव्ह आईला ‘हेलीकॉप्टर मॉम’ म्हटलं जातं. या चित्रपटातही अशीच एक आई आहे जी स्वत:च्या मुलासाठी तिचं स्वत:चं अस्तित्वच विसरून जाते. आई झाल्यानंतर ‘ती’ के वळ आईच बनून राहते. या गंभीर आणि नाजूक विषयाला अत्यंत मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे.
* ‘ईला’ आणि तुझ्यात किती साम्य आहे?- मीच काय? पण सगळया आई ‘ईला’सारख्या असतील. सगळया आर्इंनी कधी ना कधी आपल्या मुलांना रागावलेलेच असते. त्यांच्यासाठी ती कायम झटत असते. पण, ईला याबाबतीत थोडी जास्तच प्रोटेक्टिव्ह आहे.
* तुझी आई तनुजा देखील ‘हेलीकॉप्टर ईला’ आहेत का?- नाही, बिल्कुल नाही. माझी आई तर ‘कुल मॉम्स’ च्या कॅटेगरीत येते. ती आमच्या सगळयांच्या मागे कधीही लागत नाही. होय, फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत ती जरूर कधी कधी रागावते. परंतु, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी तिने अडवणूक केली नाही. ती नेहमी म्हणायची की, तुम्हाला मी वेगळं काहीतरी शिकवेन. तसंच तिने केलंही. मला असं वाटतं की, केवळ आई आणि मुलांतच नव्हे तर प्रत्येक नात्यात ‘स्पेस’ हवा.
* चित्रपटात रिद्धी सेन हा तुझा मुलगा आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- रिद्धी खूप चांगला मुलगा आणि उत्कृष्ट कलाकार देखील आहे. गंमत तर अशी आहे की, चित्रपटाच्या शूटिंगवेळीच त्याने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला होता. त्यानंतर आम्ही त्याला खूप चिडवले.* चित्रपटाच्या स्क्रिप्ट निवडीबद्दल काय सांगशील?- मी काम करण्यास उत्सुक नाही, असे नाहीये. पण, जोपर्यंत चांगली स्क्रिप्ट माझ्याकडे येत नाही, तोपर्यंत मी चित्रपट स्विकारू शकत नाही. त्यामुळे मला स्क्रिनवर येण्यास विलंब होतो. मात्र, याचा हा अर्थ नाही की, मी व्यस्त नाहीये. माझी मुले, कुटुंब आणि होम प्रोडक्शन यामध्ये मी खूप बिझी असते.
* सध्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबाबत काय वाटते?- सध्याचा काळ खूप चांगला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे इंडस्ट्रीत खूप संधी निर्माण होत आहेत. सध्याचे प्रेक्षक हे प्रादेशिकपासून ते हॉलीवूडपर्यंत सर्व कंटेंट पाहतात. चांगल्या कथानकांमुळे इंडस्ट्रीचे स्टँडर्ड वाढले आहे.
* सध्या बायोपिकचा ट्रेंड जोरात आहे. तू तुझ्या बायोपिकबद्दल काय विचार केलास?- बायोपिकचा ट्रेंड सध्या जोरात आहे. मात्र, मी अमिताभ बच्चन यांची बायोपिक बघण्यास उत्सुक आहे. कारण, त्यांच्याकडून आम्ही बरंच काही शिकलो आहेत. तसेच नानी शोभना समर्थ आणि आई तनुजा यांची बायोपिक बघायलाही मला आवडेल.