सध्या भारतात महाकुंभमेळ्याची चांगलीच चर्चा आहे. महाकुंभमेळ्यातील अनेक साधू, साध्वी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. महाकुंभमेळ्यातील हर्षा रिछारिया या सुंदर साध्वीनंतर आणखी महाकुंभमेळ्यात माळा विकणारी एक मुलगी व्हायरल झाली. तिचं नाव मोनालिसा. मोनालिसाला बॉलिवूडकडून एका सिनेमाची लॉटरीही लागली. मोनालिसावर अभिनेत्री कंगना राणौतने पोस्ट लिहून बॉलिवूड अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे.
कंगना राणौतची मोनालिसाबद्दल खास पोस्ट
कंगना राणौतने लिहिलंय की, "मोनालिसा नावाची एक तरुण मुलगी नैसर्गिक सौंदर्याच्या जोरावर आज इंटरनेट सेंसेशन बनली आहे. या मुलीची मुलाखत घेणाऱ्या आणि तिचे फोटो क्लिक करुन तिला त्रास देणारी लोक मला अजिबात आवडत नाहीत. मी या मुलीची मदत तर करु शकत नाही पण मी हा विचार करते की, आमच्या ग्लॅमर वर्ल्डमध्ये डार्क डस्की वर्ण असलेल्या अभिनेत्री कोणी आहेत का?"
कंगना राणौत पुढे म्हणाली, "अनु अग्रवाल, काजोल, दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी यांना जसं लोकांनी प्रेम दिलं तशीच पसंती आजच्या अभिनेत्रींना मिळेल का. सर्व अभिनेत्री आता इतक्या गोऱ्या का दिसत आहेत? तरुण वयात ज्या अभिनेत्री डस्की होत्या त्या सुद्धा आता वेगळ्या दिसत आहेत. जसं लोक मोनालिसाला पसंत करतात तसं आजच्या अभिनेत्रींना का करत नाही. ग्लूटाथिऑन इंजेक्शन आणि लेझर ट्रीटमेंटचं प्रमाण वाढत चाललंय."