विक्रांत मेस्सीच्या आगामी 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाची चर्चा सध्या जोरात आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झाला. तेव्हापासून सिनेमाच्या विषय, आशयाला उद्देशून प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. अशातच काल संसद भवनात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसाठी 'द साबरमती रिपोर्ट' विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी खासदार झालेली कंगना राणौतही उपस्थित होती. कंगनाने 'द साबरमती रिपोर्ट' पाहिल्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
'द साबरमती रिपोर्ट' पाहून कंगना काय म्हणाली?
संसद भवनात 'द साबरमती रिपोर्ट'चं स्क्रीनिंग पाहिल्यावर कंगनाने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. कंगना मीडियाशी संवाद साधताना म्हणाली की, "हा सिनेमा खूप महत्वाचा आहे. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. याशिवाय आधीच्या सरकारने लोकांना अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत. लपवून ठेवल्या. कठीण काळात त्या वेळच्या लोकांनी राजकारण कसं केलं, याची माहिती हा सिनेमा दाखवतो." कंगनाने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेत आहे.
'द साबरमती रिपोर्ट'चं संसदेत विशेष स्क्रीनिंग
काल 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं संसद भवनात स्पेशल स्क्रीनिंग झालं. २ डिसेंबर(सोमवारी) संध्याकाळी ७ वाजता 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग संसद भवन परिसरात करण्यात आलं. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित होते. याशिवाय इतरही मंत्री सहभागी होते. 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीने काल बॉलिवूडमध्ये संन्यास घेणार असं सांगितलं. २०२५ ला विक्रांत त्याचे आगामी सिनेमे रिलीज करुन बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकणार आहे.