सध्या ओटीटीवर रिलीज झालेल्या एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे 'मिसेस' (mrs movie). सान्या मल्होत्राने 'मिसेस' सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा विषय, आशय आणि कलाकारांचा अभिनय आदी गोष्टींची खूप चर्चा आहे. सर्वत्र सिनेमाचं कौतुक होत असतानाच बॉलिवूडची 'क्वीन' अर्थात कंगना रणौतने (kangana ranaut) 'मिसेस' सिनेमावर नाराजी दर्शवणारी पोस्ट केली आहे. काय म्हणाली कंगना?
कंगना काय म्हणाली?
कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मिसेस' सिनेमाबद्दल तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. कंगना लिहिते की, "मी मोठी होत असताना कधीही अशा महिला बघितल्या नाहीत ज्यांचा घरात स्वतःचा अधिकार नाही. याशिवाय कधी जेवायचं, झोपायचं, बाहेर जायचं याबद्दल या महिलांचं काही मत नाही, असंही मी पाहिलं नाहीये. जेव्हा बाबा आम्हाला घेऊन बाहेर जायचे तेव्हा आई त्यांना ओरडायची. कारण आईला आमच्यासाठी घरी जेवण बनवायला आवडायचं. माझ्या घरातील काकी, नानी आणि घरातील सर्व महिला या राणी आहेत. महिलांना कामगार म्हणणं बंद करा. घरातील काम आणि मुलांना सांभाळण्यामध्ये एक आनंद असतो. त्या गोष्टीला जबरदस्ती म्हणू नका."
कंगनाने शेवटी पोस्ट लिहून बॉलिवूड सिनेमांवरही आगपाखड केली आहे. कंगना लिहिते की, "बॉलिवूड सिनेमांनी लग्नसंस्था बर्बाद केली आहे. याच सिनेमांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तींना दूर करणं आणि मुलांना जन्म न घालण्याची, शिकवण दिली आहे." कंगनाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. लोकांनी कंगनावरच उलट टीका केली कारण कंगना रिअल लाइफमध्ये सिंगल आहे. त्यामुळे तिने अशी पोस्ट करणं म्हणजे एक विरोधाभास आहे, अशी प्रतिक्रिया लोकांनी केली आहे.