कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे भाष्य करत असतात. यामध्येच सध्या अभिनेत्री करिश्मा तन्ना ( karishma tanna) हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. करिश्माने इन्स्टाग्रामवर केदारनाथमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने 'आमच्या पवित्र देवभूमीला हजारो मृत घोड्यांचे स्मशान होण्यापासून वाचवा!', असं म्हटलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांचं लक्ष केदारनाथकडे वेधलं गेलं आहे.
अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं ठिकाण म्हणजे केदारनाथ. जवळपास ३ हजार ५३८ मीटर उंचीवर असलेल्या या मंदिरात जगभरातून लाखो भाविक येतात. यात गौरी कुंड ते केदारनाथ धाम मंदिरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी ६ ते ७ तास लागतात. लांबचा पल्ला असल्यामुळे अनेक जण घोडे किंवा डोलीच्या माध्यमातून मंदिरापर्यंत पोहोचतात. मात्र, या प्रवासात बऱ्याचदा घोड्यांना मृत्यूमुखी पडावं लागतं. त्यामुळेच सध्या केदारनाथमध्ये घोड्यांची होत असलेली अवस्था पाहता करिश्माने भाविकांना एक आवाहन केलं आहे.
"जेव्हा हे प्राणी तुम्हाला स्वत:च्या पाठीवर बसवून तिर्थयात्रेला घेऊन जातात. त्यावेळी त्यांना प्रचंड शारीरिक त्रास होत असतो. काही वेळा हे घोडे वेदनेने त्रस्त होऊन, व्याकूळ होऊन किंचाळतात. पण, तरी सुद्धा तुम्हाल त्यांचा त्रास दिसत नाही का? तुम्ही देवाचं दर्शन घेत असताना तुमच्यामुळे एका जीवाचे प्राण जातायेत हे तुम्हाला दिसत नाही का?या मुक्या प्राण्यांचा वापर त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत केला जातो तरी सुद्धा तुम्ही गप्प कसे? चारधाम यात्रेदरम्यान ज्या घोड्यांचा जीव जातो त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त लाचार आहात हे दिसतं", असं करिश्मा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तीर्थ यात्रेला जाऊन तुम्ही पाप करुन येताय. निदान आता तरी जागे व्हा आणि स्वत:च्या पायाने चालत जाऊन देवदर्शन करा. या प्राण्यांचा त्रास जरा जवळून अनुभवा. शांत बसू नका. मी पुष्कर सिंह धाम यांना आवाहन करते की, आमच्या पवित्र देवभूमीला हजारो मृत घोड्यांचे स्मशान होण्यापासून वाचवा!”
दरम्यान,“आजच्या काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांचा दुरुपयोग होतोय हे खरंच धक्कादायक आहे. केदारनाथमध्ये दरवर्षी शेकडो घोड्यांचा मृत्यू होतोय. जर तुम्ही बोलला नाहीत, तर बदल होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहून याविषयी जनजागृती करावी, असं करिश्माने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.