बॉलिवू़ड आणि मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येतेय. कश्मीराने स्वतः सोशल मीडियावर तिच्या अपघातासंबंधी बातमी शेअर केली. कश्मीराने फोटो शेअर करताच चाहत्यांना तिची काळजी वाटली. कारण कश्मीराचे कपडे रक्ताने माखलेले दिसले. सुदैवाने मोठी हानी टळून कश्मीरा या अपघातात बचावली आहे.
कश्मीराचा भीषण अपघात
कश्मीरा सध्या लॉस एंजेलिस शहरामध्ये होती. तिचा पती आणि अभिनेता कृष्णा अभिषेक मुलांसह ७ नोव्हेंबरला भारतात परतला. परंतु काही कारणास्तव कश्मीरा LA ला थांबली होती. अशातच प्रवास करताना कश्मीराचा अपघात झाला. कश्मीराने रक्ताने माखलेल्या कपड्यांचे फोटो पोस्ट करुन तिच्या अपघाताविषयीची बातमी सर्वांना सांगितली. कश्मीराने लिहिलंय की, "मला वाचवण्यासाठी देवाचे आभार. खूप भयानक घटना होती. काहीतरी मोठं घडलं असतं. परंतु थोडक्यात निभावलं. जखमेच्या खुणा राहणार नाहीत याची मला आशा आहे. प्रत्येक क्षण जगा. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येतेय." असं म्हणत कश्मीराने कृष्णा आणि तिच्या दोन्ही मुलांचं नाव मेंशन केलंय.
या अपघातावर कृष्णा अभिषेक काय म्हणाला?
कश्मीराच्या या पोस्टखाली कृष्णा अभिषेक लिहितो की, "देवाच्या कृपेने तू ठीक आहेस." याशिवाय कश्मीराच्या चाहत्यांनी या अपघातातून सावरण्यासाठी कश्मीराला धीर दिला आणि तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली. दरम्यान कश्मीराने लिहिलं तसं.. ती या अपघातात थोडक्यात बचावली असून ती उपचार घेऊन लवकरात लवकर मुंबईत परतेल. कश्मीराने 'लालबाग परळ', 'शिकारी' अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला असून ती हिंदी सिनेसृष्टीतही सक्रीय आहे.