Meenakshi Sheshadri NEW LOOK : 80 व 90 च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri ). दामिनी, हिरो, घातक असे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या मिनाक्षीनं स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांसोबत तिने काम केलं. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाऊ लागली. पण नाव, प्रसिद्धी, पैसा असं सगळं काही असताना मिनाक्षीने एकाएकी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. केवळ बॉलिवूडच नाही तर देश सोडून ती परदेशात स्थायिक झाली. आता ही मिनाक्षी आठवण्याचं कारण म्हणजे, तिचा नवा लुक. होय, 58 वर्षांच्या मिनाक्षीने तिच्या नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोत मिनाक्षीने स्काय कलरची हुडी घातलेली दिसतेय. डोळ्यांवर चष्मा आहे आणि केस शॉर्ट आहेत. तिच्या लुकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काहींना तिचा हा लुक आवडला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे तो पाहून नाकं मुरडली आहेत.मिनाक्षी सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. 1995 मध्ये मिनाक्षीने अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे, लग्नाची बातमी तिने बराच काळ दडवून ठेवली.
लग्नानंतरही ती चित्रपटात काम करत राहिली. पण अखेर मिनाक्षीच्या लग्नाचा खुलासा झाला आणि यानंतर मिनाक्षीने अचानक बॉलिवूड सोडून पतीसोबत परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती कधीही चित्रपटात दिसली नाही.
गेल्या काही वर्षांत मिनाक्षी कमालीची बदलली आहे. इतकी की, तिला ओळखणंही कठीण आहे. मिनाक्षीला एक मुलगा व एक मुलगी आहे. मिनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या मिनाक्षीने तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.
2015 मध्ये ऋषी कपूर यांनी मिनाक्षीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत मिनाक्षीला ओळखणं कठीण झालं होतं. खुद्द ऋषी कपूर यांनी सुरुवातीला मिनाक्षीला ओळखलं नव्हतं. मिनाक्षीला इतकं बदललेलं बघून त्यांनाही धक्का बसला होता.