सिनेसृष्टीसाठी आणखी एक दु:खद बातमी आहे. बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे केवळ वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले. मिष्टी दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. काही महिन्यांपासून ती किटो डाएटवर होती. शुक्रवारी संध्याकाळी बेंगळुरू येथे तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्यामागे आईवडील व एक भाऊ आहे.
2013 साली ‘मैं कृष्णा हूं’ या मालिकेतून मिष्टीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘मैं कृष्णा हूं’मध्ये डान्स नंबर केल्यानंतर ती दिग्दर्शक राकेश मेहता यांच्या ‘लाईफ की तो लग गई’ या सिनेमात झळकली. मिष्टीने अनेक आयटम नंबर्समध्ये काम केले. अनेक मोठ्या पार्ट्या व इव्हेंटमध्ये ती दिसायची. अनेक बंगाली सिनेमांतही तिने काम केले.
2014 मध्ये ती एका मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीमध्ये अडकली होती. ती सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या गंभीर आरोप लागल्यामुळे ती मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळी पोलिसांनी मिष्टीच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक अश्लील सीडी आणि साहित्य जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिच्या वडील व भावाला अटकही झाली होती. यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.दरम्यान मिष्टीच्या अकाली निधनाने बंगाली व हिंदी सिनेसृृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या वर्षांत अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्रींनी जगाचा निरोप घेतला. सुशांत सिंग राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर असे अनेक दिग्गज या जगातून गेले. आता मिष्टीच्या जाण्याने बंगाली आणि हिंदी सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे.