मेहा शर्मा
वर्तमानात बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम कन्टेन्ट उतरत आहेत. प्रत्येकच निर्मितीमध्ये रिसर्च, समाजाची नाळ आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडेल अशा कथानकांवर जोर दिला जात असल्याचे परखड आणि बिनधास्त म्हणून ओळख असलेली माजी मिस इंडिया व प्रख्यात अभिनेत्री नेहा धुपिया हिने सांगितले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘अ थर्सडे’ या चित्रपटात तिने गर्भवती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्या पार्श्वभूमीवर तिने लोकमतशी संवाद साधला.
प्रश्न: दुहेरी कर्तव्य साकारण्याचा अनुभव कसा होता?
उत्तर: एक गर्भवती स्त्री आणि लहान मुलांना ओलीस ठेवल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य, अशा दुहेरी कर्तव्यात अडकलेले पात्र साकारताना, मनाचे हेलकावे कसे असू शकतात, हे यातून अनुभवता आले. ही बाब जेवढी माझ्यासाठी भावनित होती, तेवढीच प्रेक्षकांसाठीही ठरते. वैयक्तिक आयुष्यातही मलाच काय, अनेकांना अशा दुहेरी कर्तव्यातून जावे लागते.
प्रश्न: ओटीटी प्लॅटफॉर्म गेम चेंजर ठरते आहे का?उत्तर : हो, नक्कीच. पूर्वी प्रत्येकाला तिकीट काढून सिनेमागृहात जावे लागत होते. आता केवळ सब्सक्राईब करून जगभरात त्यांना आवडणाऱ्या सिनेमांचा आनंद घेता येतो. ओटीटीमुळे निर्मात्यालाही हवे ते कन्टेन्ट देणे सोपे झाले आहे.
प्रश्न: बदल कुणात झाला आहे, प्रेक्षकांमध्ये की निर्मात्यांमध्ये? उत्तर: निर्माते सद्य:स्थितीत जगभरातील कन्टेन्टशी स्पर्धा करत आहेत. त्याचा लाभ प्रेक्षकांनाही होत आहे. पूर्वी आपण केवळ शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांवर विसंबून राहायचो. आता कोरियन, हॉलिवूड, शॉर्ट फिल्म आदी कधीही कुठेही बसून पाहू शकतो.
प्रश्न: एका अभिनेत्यासाठी सोशल मीडियाचे महत्त्व काय आहे?उत्तर: स्वत:ला अभिव्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया सर्वोत्तम आहे. सोशल मीडिया हा एक आवाज आहे आणि त्याचा लाभ अभिनेता-अभिनेत्री म्हणून प्रत्येकाला घेता येत आहे.