बंगाली अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ ( Nusrat Jahan) सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. चर्चा आहे ती त्यांच्या पर्सनल लाईफची. काही दिवसांपूर्वीच नुसरत यांनी मुलाला जन्म दिला. मात्र या मुलाचा पिता कोण? असा प्रश्न त्यांना सारखा विचारला जातोय. सोशल मीडियावर यावरून त्यांना ट्रोलही केलं जातंय. अलीकडे एका कार्यक्रमातही बाळाच्या वडिलांबद्दलचा प्रश्न त्यांना विचारला गेला आणि यावेळी त्यांना उत्तर द्यावंच लागलं.‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या बुधवारी कोलकात्यातील एका उद्घाटन सोहळ्यावेळी पत्रकारांनी त्यांना बाळाच्या पित्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर नुसरत काहीशा बिथरल्या.
माझ्या मते, हा प्रश्न व्यर्थ आहे. एखाद्या महिलेला तिच्या बाळाचे वडील कोण आहे, हे विचारणं म्हणजे तिच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करणं आहे. बाळाच्या वडिलांना माहित आहे की, ते या बाळाचे वडील आहेत आणि आम्ही सोबत बाळाचे अतिशय चांगले संगोपण करत आहोत. यश (यशदास दासगुप्ता) आणि मी आम्ही चांगला वेळ घालवत आहोत, असं त्या म्हणाल्या. बाळाचा चेहरा केव्हा दाखवणार? असा एक प्रश्नही पत्रकारानं केला. यावर हे तुम्ही त्याच्या वडिलांना विचारा. तोच कुणालाही बाळाला पाहू देत नाही, असं नुसरत यांनी स्पष्ट केलं.
नुसरत यांनी 2019 मध्ये निखील जैनसोबत लग्न केलं होतं. तुर्कीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. मात्र लग्नानंतर दोन वर्षांनी नुसरत व निखील यांच्या नात्यात मतभेद निर्माण झालेत आणि कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला. इतकंच नाही तर निखीलसोबतचं आपलें लग्न अवैध असल्याचा दावा करून नुसरत यांनी खळबळ निर्माण केली.
हे लग्न तुर्कीच्या कायद्यानुसार झालं होतं. भारतात या लग्नाची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे लग्नच वैध नाही तर घटस्फोट घेण्यादेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं नुसरत यांनी स्पष्ट केलं होतं. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे, यानंतर नुसरतच्या गर्भात वाढत असलेलं बाळ आपले नाही, असं निखीलने जाहिरपणे सांगितलं होतं.नुसरत सध्या बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अर्थात नुसरत वा यश दोघांनीही अधिकृतपणे आपल्या नात्याची घोषणा केलेली नाही.