‘जिस्म’ सीरिजचे दोन्ही चित्रपट भट्ट कॅम्पसाठी नफ्याचा सौदा ठरला़ अलीकडच्या काळात भट्ट कॅम्पने आपल्या चित्रपटात अनेक प्रयोग केले. पण हे नवे प्रयोग फसल्यानंतर भट्ट कॅम्प पुन्हा एकदा आपल्या जुन्या गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलच्या रूपात प्रेक्षकांचे मनोरंजनक करू पाहतो आहे. अलीकडे भट्ट कॅम्पने ‘सडक 2’ या चित्रपटाची घोषणा केली. आता एक नवी खबर आहे. होय, भट्ट कॅम्पने आता आपल्या ‘जिस्म’ फ्रेन्चाइजीचा तिसरा चित्रपट आणण्याची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटाची सगळी सूत्रे महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट सांभाळणार आहे.सव्वा तीन कोटी रूपये खर्चून बनलेल्या ‘जिस्म’ या २००३ मध्ये आलेल्या चित्रपटाने ३८ कोटींचा बिझनेस केला होता. यानंतर ‘जिस्म’चा दुसरा भाग आला. १३ कोटी रूपये बजेट असलेल्या ‘जिस्म 2’ने ५०कोटींचा गल्ला जमवला. म्हणजे हे दोन्ही चित्रपट भट्ट कॅम्पसाठी फायद्याचे ठरले. ‘जिस्म’मध्ये भट्ट कॅम्पने बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमची जोडी बनवली होती. तर ‘जिस्म 2’मध्ये सनी लिओनी, रणदीप हुड्डा आणि अरूणोदय सिंह लीड रोलमध्ये होते. ‘जिस्म 3’साठी मात्र पूजा भट्टला नव्या चेहऱ्यांचा शोध आहे. पूजाचे मानाल तर, या चित्रपटासाठी अशीच हिरोईन निवडली जाईल, जी बिपाशा आणि सनी लिओनी इतकी बोल्ड आणि त्यांच्या पर्सनॅलिटीला मॅच करणारी असेल. या चित्रपटासाठी तिला पंचविशी ओलांडलेली नायिका हवी आहे. अर्थात हा प्रयोग जरा धोकादायक आहे. कारण बॉलिवूडचे निर्माता-दिग्दर्शकांनी कायम कमी वयाच्या सुंदर अभिनेत्रींना लॉन्च करण्यात रस दाखवला आहे. पण पूजा त्यातली नाहीच. आपण कुठपर्यंत कमी वयाच्या मुलींनाच रोमान्स करताना आणि तरूणाईची फँटसी बनताना दाखवणार आहोत? आपला प्रेक्षक कधीच मोठा होणार नाही का? असा पूजाचा सवाल आहे.‘जिस्म 3’ची निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्ही पूजा करणार आहे. ‘जिस्म 2’ ही पूजानेचं दिग्दर्शित केला होता. आता पूजा ‘जिस्म 3’ घेऊन येतेय. यात ती किती यशस्वी होते आणि हा चित्रपट भट्ट कॅम्पला किती नफा मिळवून देतो, ते बघूच.
प्रेक्षक कधी मोठे होणार? ‘जिस्म3’च्या निमित्ताने पूजा भट्टचा असाही सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 2:37 PM