१९७० साली प्रदर्शित झालेला 'हीर रांझा' हा सिनेमा आज काही मोजक्या मंडळींना लक्षात असेल चेतन आनंद दिग्दर्शित या सिनेमातील प्रत्येक गाणं सुपरहिट झालं होतं. त्यातलं 'मिलो ना तुम तो हम घबराए, मिलो तो आंख चुराए' हे गाणं तर आज ५० वर्षानंतरही तितकंच लोकप्रिय आहे. या सिनेमातून प्रिया राजवंश ही अभिनेत्री नावारुपाला आली. या गाण्यातील तिची स्टाइल प्रेक्षकांना इतकी आवडली की ती रातोरात सुपरस्टार झाली. मात्र, या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीचा करुण अंत झाला. तिच्या सावत्र मुलानेच तिच्या हत्येचा कट रचल्याचं सांगण्यात येतं.
७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया राजवंशकडे पाहिलं जात होतं. आपल्या २२ वर्षाच्या करिअरमझ्ये तिने केवळ ७ चित्रपट केले. विशेष म्हणजे तिने सर्व चित्रपट फक्त तिच्या पतीसोबतच केले होते.
शिमलामध्ये जन्मलेल्या प्रियाने तिचं शालेय शिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केलं. प्रियाला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं. त्याच वेळी ६० च्या दशकात कलाविश्वात अनेक नवनवीन बदल होत होते. तेव्हा प्रियाने तिचे काही फोटो काढले आणि पोर्टफोलिओ तयार केला. प्रियाचे हेच फोटो दिग्दर्शक चेतन आनंद यांनी पाहिले आणि तिला त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. परंतु. चेतन आनंद यांना भेटल्यानंतर प्रियाचं आयुष्य बदलून गेलं.
आयुष्यात आला मोठा टर्निंग पॉईंट
पहिल्या चित्रपटासाठी प्रियाने मुंबई गाठली आणि चेतन आनंद यांना भेटली. चेतन यांनी प्रियाला त्यांच्या सिनेमात कास्ट केलं. या सिनेमात धर्मेंद्र आणि बलराज साहनी मुख्य भूमिकेत होते. तर, त्यांच्या जोडीला प्रियालादेखील मुख्य अभिनेत्री म्हणून निवडलं. एकीकडे प्रियाच्या करिअरची सुरुवात झाली. तर, दुसरीकडे चेतन आनंद त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून दुरावले. सिनेमाच्या सेटवरच चेतन आनंद आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर प्रियाने चेतन आनंद यांच्यासोबतच सलग ७ सिनेमा केले.
असा झाला प्रियाचा दुर्दैवी अंत
चेतन आणि प्रिया एकमेकांना डेट करत असल्यामुळे चेतन यांनी आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलांपासून फारकत घेतली. त्यांच्या पहिल्या पत्नीला २ मुले होते. मात्र, या दोन्ही मुलांना प्रिया अजिबात आवडत नव्हती. चेतन आनंद यांचं १९९७ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर, त्यांच्या मृत्यूपत्रात संपत्तीमधील निम्म्याहून अर्धी संपत्ती प्रिया राजवंशला देण्यात यावी असं नमूद करण्यात आलं होतं. परिणामी, याचा राग त्यांच्या मुलांच्या विवेक आणि केतन यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी प्रियाच्या हत्येचा कट रचला. घरातील दोन नोकरांच्या मदतीने त्यांनी २००० साली प्रियाचा खून केला. या हत्येनंतर दोन वर्षांनी पोलिसांनी तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली.