Join us

70 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीची सावत्र मुलांनीच केली हत्या, अभिनेते देवानंदशी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 3:15 PM

१५ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लिव्ह इन रिलेशन आणि नंतर दुर्देवी मृत्यू तिच्या वाट्याला आला होता.

फिल्म इंडस्ट्री ही दुरुन कितीही झगमगाटासारखी दिसत असली तरी जवळून बघितल्यावर त्यातलं वास्तव कळतं. पैसा, प्रसिद्धी हे तोवरच आहे जोवर तुमच्याकडे स्टारडम आहे. एकदा का तुम्ही इंडस्ट्रीपासून काही काळासाठी दूर गेलात की लगेच तुमची जागा घेणारे कोणी ना कोणी असतेच. याच फिल्मइंडस्ट्रीत अनेक असे कलाकार आहेत ज्यांना दुर्देवी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंश. १५ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लिव्ह इन रिलेशन आणि नंतर दुर्देवी मृत्यू तिच्या वाट्याला आला होता.

काय आहे प्रिया राजवंशची कहाणी?

प्रिया राजवंशचा जन्म 30 डिसेंबर 1936 रोजी शिमलामध्ये झाला होता. तिचं खरं नाव वीरा सुंदर सिंह असं होतं. प्रिया उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. लंडनमधील तिच्या एका फोटोवरून तिला चित्रपटांचे ऑफर्स मिळायला सुरुवात झाली. याचवेळी प्रियाची ओळख देवानंदचे भाऊ चेतन आनंद यांच्याशी झाली. चेतन आनंद यांनी 1964 साली प्रियाला 'हकीकत' या सिनेमात कास्ट केले. सिनेमाच्या शूटदरम्यान त्यांच्यातील मैत्री वाढू लागली. त्यावेळी चेतन आनंद यांचं लग्न झालं होतं. पण ते पत्नीपासून वेगळे राहत होते. हळूहळू ते प्रियाच्या प्रेमात पडले. त्यांचं प्रेम इतकं टोकाचं होतं की ते प्रियाला इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करु द्यायचे नाहीत.

यानंतर काही वर्षांनी प्रिया 'हीर रांझा' सिनेमामुळे चर्चेत आली. राजकुमार यांच्या या सिनेमातून प्रिया लोकप्रिय झाली. यानंतर तिने अनेक चित्रपट केले. दरम्यान प्रिया आणि चेतन आनंद यांच्यातही प्रेम फुलत होते. दोघंही त्याकाळी लिव्ह इन मध्ये राहत होते. विशेष म्हणजे चेतन आनंद प्रियाहून १५ वर्षांनी मोठे होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं होती. 1977 साली चेतन आनंद यांचं निधन झालं. यामुळे ती पूर्णपणे खचली. प्रिया चेतन आनंद यांच्या मुलांसोबत सलोख्याने राहायची.

चेतन यांचं प्रियावर जीवापाड प्रेम असल्याने त्यांनी संपत्तीचे तीन भाग केले होते. प्रिया आणि दोन्ही मुलांमध्ये त्यांनी संपत्तीचं वाटप केल्याचं त्यांच्या मृत्यूपत्रातून समोर आलं. मात्र 27 मार्च 2000 रोजी प्रियाचा जुहू येथील निवासस्थानी मृतदेह आढळून आला. चेतन आनंद यांची मुलं केतन आणि विवेक यांनीच प्रियाची गळा दाबून हत्या केल्याचं तपासात समोर आलं. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी धक्क्यात होती. केतन आणि विवेक यांना जन्मठेप सुनावण्यात आली. मात्र 2002 मध्ये त्यांची जामीनावर सुटका झाली. 

टॅग्स :देव आनंदबॉलिवूड