'छावा' (chhaava movie) सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. हा सिनेमा पुढील तीन दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छावा'च्या रिलीजची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा कधी एकदा थिएटरमध्ये पाहता येईल, असं अनेकांना झालं असेल. अशातच 'छावा'च्या रिलीज डेटला अवघे ३ दिवस बाकी असताना रश्मिकाने (rashmika mandanna) सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (laxman utekar) यांच्यासाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे.
रश्मिकाची 'छावा'च्या दिग्दर्शकांसाठी खास पोस्ट
रश्मिकाने सोशल मीडियावर विकी कौशल आणि 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत खास फोटोशूट केलंय. हे फोटोशूट पोस्ट करुन रश्मिका लिहिते की, "लक्ष्मण सर सध्या सिनेमाचं एडिटिंग आणि सिनेमाशी निगडीत इतर कामांमध्ये सध्या व्यस्त आहेत. त्यामुळे मी आणि विकीने त्यांना किडनॅप करुन त्यांच्यासोबत छोटंसं फोटोशूट केलं. हे फोटोशूट संपवून आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की, छावा ३ दिवसात तुम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. आम्ही खूप म्हणजे खूप उत्सुक आहोत." रश्मिकाच्या या पोस्टखाली अनेकांनी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
'छावा'चं अॅडव्हान्स बूकिंग जोरदार
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाची अॅडव्हान्स बुकींग रविवारी ९ फेब्रुवारीला सुरु झाली. अवघ्या ४८ तासांमध्ये 'छावा' सिनेमाच्या तब्बल २ लाख तिकिटांची विक्री झालीय. भारतभरातील अनेक थिएटर्स 'छावा'च्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी हाउसफुल्ल आहेत. त्यामुळे अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 'छावा' सिनेमाने तब्बल ५ कोटींची कमाई केलीय. हा कमाईचा आकडा बघता जेव्हा सिनेमा रिलीज होईल, तेव्हा तिकिटांची विक्री आणखी जास्त होईल यात शंका नाही.