टीव्ही आणि बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादानंतर याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यानंतर हम साथ साथ है चित्रपटातील महिला सदस्यासमोरच आलोक नाथ यांनी कपडे काढले असल्याचे या महिला क्रू मेंबरने एका मुलाखतीत सांगितले आहे. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
संध्या मृदुलने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. संध्याने एका मालिकेत आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप वाईट अनुभव आला होता. आलोक नाथ मला सर्वांसमोर मुलीसारखं वागवायचे, मात्र त्यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला आहे, चित्रीकरणाच्या काळात त्यांनी मला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. माझ्या रुममध्ये येऊन असभ्य वर्तन केलं असे अनेक गंभीर आरोप संध्याने केले आहेत. संध्याने ट्वीटरच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तिने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या करियरच्या सुरुवातीला आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते. मला त्यांच्याविषयी खूपच आदर होता. ते नेहमीच सेटवर मला मुलीसारखे वागवायचे. माझ्या कामाचे कौतुक करायचे. पण एकेदिवशी ते अतिशय वाईट पद्धतीने माझ्याशी वागले. एकदा मालिकेतील सगळ्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. जेवल्यानंतर मी हॉटेलच्या रुमवर परतले, तेव्हा रात्र खूपच झाली होती. दुसऱ्या दिवशी चित्रीकरण असल्याने कॉश्च्युम दादाने मला रूमवर कपडे आणून दिले. ते गेल्यानंतर माझ्या रूमची बेल पुन्हा वाजली. त्यावेळी कॉश्च्युम दादाच परत आले असतील असे मला वाटले. पण माझ्या दरवाज्यात आलोक नाथ होते. ते पूर्णपणे दारूच्या नशेत होते. त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तू माझी आहेस, तू मला हवी आहेस असे ते जोराजोरात ओरडत होते. त्यांच्या या वागण्याने मला जबरदस्त धक्का बसला. मी स्वत:ला वाचवण्यासाठी रुमबाहेर पळ काढला. ते माझ्या खोलीत तसेच बसून होते. शेवटी आम्ही कसंबसं त्यांना खोलीतून बाहेर काढलं. ते माझ्यावर ओरडत होते, माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचं यापूर्वी कधीही न पाहिलेला चेहरा मी त्यादिवशी पाहिला. मी प्रचंड मानसिक धक्क्यात होते. त्यावेळी माझी हेअरड्रेसर माझ्या खोलीत झोपली. त्यानंतर ते रोज मद्यपान करून येत. मला फोन करून छळायचे. हे सारं माझ्यासाठी खूपच असह्य व्हायचं. या सगळ्यामुळे माझी हेअरड्रेसर माझ्याच खोलीत झोपायला लागली. या सगळ्या प्रसंगात रिमा लागू यांनी मला साथ दिली. आलोक नाथपासून त्यांनी मला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याकाळात मुलीसारखी त्यांनी माझी काळजी घेतली. या घटनेनंतर काही महिन्यांनी आलोक नाथ यांनी माझी माफी मागितली, आपण सुधारू असंही ते म्हणाले. पण या सगळ्यासाठी खूप उशीर झाला होता.