मोनिका बेदी बॉलिवूडमध्ये चित्रपटांपेक्षा कमी आणि अबू सालेमसोबतच्या रिलेशनशीपमुळे जास्त चर्चेत आली आहे. मोनिकाचा जन्म पंजाबमधील होशियारपुरमध्ये झाला आहे. मोनिकाने आपले शिक्षण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे. तिने तिच्या सिनेकारकीर्दीची सुरूवात १९९५ साली तेलगू सिनेमा ताजमहलमधून केली होती. तिचा पहिला मोठा चित्रपट सुरक्षा होता, ज्यात तिच्यासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता.
बॉलिवूडमध्ये 'आशिक मस्ताने', 'तिरछी टोपीवाले', 'जंजीर', 'जानम समझा करो' आणि 'जोड़ी नंबर १' हे तिचे मोठे चित्रपट आहेत. मोनिका बेदीचे फिल्मी करिअर फार काळ चालू शकले नाही. मोनिका बिग बॉसची एक्स कंटेस्टंटदेखील आहे. मोनिका आपल्या चित्रपटापेक्षा जास्त दाऊदचा डावा हात म्हटल्या जाणाऱ्या अबू सालेमसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली. या प्रेमासाठी तिला तुरूंगातही जावे लागले होते.
मोनिका म्हणाली की, मी कधी विचार केला नव्हता की, कोणत्या व्यक्तीसोबत फोनवर बोलून बोलून त्याला इतके पसंत करू लागेन की त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी असे म्हणणार नाही की मी त्याच्या प्रेमात पडले होते पण हो मला तो आवडू लागला होता. इतके की त्याच्या फोनची वाट पाहत होते. जर फोन नाही आला तर मी बेचैन व्हायचे. फोनवर बोलताना अबू मला खूप गंभीर आणि स्थायिक व्यक्ती वाटला.