Join us  

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू उर्फ सिद्धार्थ रेच्या निधनानंतर अशी झालेली पत्नीची अवस्था, म्हणाली - तो फक्त ३८ वर्षांचा होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 4:38 PM

Siddharth Ray And Shanthipriya : ८ मार्च २००४ रोजी सिद्धार्थ रेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनानंतर पत्नीची अवस्था कशी झाली होती, याबद्दल शांतीप्रियाने खुलासा केलाय.

'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banva Banvi) या एव्हरग्रीन सिनेमाने आणि त्यातील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. यातील एक लोकप्रिय पात्र म्हणजे शंतनू. ही भूमिका साकारली होती अभिनेता सिद्धार्थ रे (Siddharth Ray)नं. शंतनूच्या भूमिकेसाठी आजही तो लोकप्रिय आहे. त्याने १९९९ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री शांतीप्रिया (Shanthipriya)सोबत लग्न केले. लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली आणि अचानक ८ मार्च २००४ रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. त्याच्या निधनानंतर पत्नीची अवस्था कशी झाली होती, याबद्दल शांतीप्रियाने खुलासा केलाय. 

पती सिद्धार्थ रेच्या निधनावर अलिकडेच शांतीप्रिया व्यक्त झाली. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत शांतीप्रिया म्हणाली की, तो खूप तरूण होता. फक्त तो ३८ वर्षांचा होता. त्यावेळी माझा एक मुलगा १० वर्षांचा तर दुसरा साडेचार वर्षांचा होता. मी इंडस्ट्रीला अलविदा केलं आणि गृहिणी झाले. मुलांना सांभाळणे, कुटुंबासोबत वेळ व्यतित करु लागले. सासरचे सोबत राहत नव्हते पण त्यांना भेटायला पुण्याला जायचो.

स्त्रीपेक्षा पुरूषाची भूमिका जास्त निभवावी लागलीती पुढे म्हणाली की, इक्के पे इक्कानंतर जवळपास १५ वर्षे कुणीच माझे फोटो पाहिले नसतील. बाजीगरच्या प्रीमिअरदरम्यानचे फोटो असतील, नंतर कोणतेच फोटो नसतील. मी धक्क्यात होते आणि मग मी माझ्या आईकडे पाहिले. कारण ती सिंगल मदर होती. सुरूवातीला मी एकटी आहे, हे सत्य स्वीकारायला मला काही महिने लागले. मला दोन्ही मुले असल्यामुळे स्त्रीपेक्षा पुरूषाची भूमिका जास्त निभवावी लागली. मी ७० टक्के पुरूष आणि ३० टक्के स्त्रीची भूमिका बजावत होते.

त्यामुळे शांतीप्रियाने मुंबईतच राहण्याचा घेतला निर्णयसिद्धार्थच्या निधनानंतर तेराव्याच्या पूजेनंतर मुंबईतील घरात बैठक झाली. आईने मला तिच्यासोबत परत येतेय ना असे विचारले. इकडे तू एकटी काय करणार? मुलांची काळजी कोण घेणार? तू काम करत नाहीयेस, तुला आधार कोणाचा आहे? तुझ्याजवळ इकडे कोणीही नाही आणि आम्ही तिकडे राहतो. आम्ही चेन्नईहून मुंबईला विमानाने यायचे ठरवले तरी किमान तीन तास लागतील. तर तू एकटी हे सगळं कसं मॅनेज करणार? त्यावर मी आईला म्हणाले, नाही. माझ्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत आणि हेच माझं कुटुंब आहे. त्यामुळे मी त्यांना सोडून जाणार नाही. त्यावेळी सिद्धार्थची ९० वर्षीय आजी होती, तिची शांतीप्रिया काळजी घेईल, असा विश्वास अभिनेत्याला होता. त्यामुळे शांतीप्रियाने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली की, मी तिला सोडू नाही शकत. कारण ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते आणि मी सिद्धार्थला आजीमध्ये बघत होते. त्यामुळे मी म्हटलं की, मी कुठेही जाणार नाही. हेच माझं घर आहे आणि मी तुमच्याबरोबर येणार नाही. आईने विचारलं, तू सगळं मॅनेज करशील, अशी तुला खात्री आहे का? आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. मी तिला हो म्हटलं. पण आता मी येणार नाही. मी मुंबईतच थांबण्याचा निर्णय घेतला.   

टॅग्स :सिद्धार्थ डे