उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील (Smita Patil). ८० चा दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचं निधन होऊन आज बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. बोलके डोळे आणि चेहऱ्यावरील मंद हास्य यामुळे स्मिता पाटील यांनी अनेकांची मनं जिंकली. परंतु, वयाच्या ३१ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज स्मिता पाटील यांची Death Anniversary असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. यामध्येच त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशीपचीही चर्चा रंगली आहे.
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत लग्न केलं होतं हे साऱ्यांनाच ठावूक आहे. या दोघांचं लव्हमॅरेज होतं. परंतु, या दोघांचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. स्मिताने राजसोबत लग्न करावं हे त्यांच्या आईला अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी स्मिताला साफ नकार दिला होता. विशेष म्हणजे याच काळात स्मिता पाटील लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होत्याय
स्मिता पाटील यांनी श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर त्यांच्या करिअरचा आलेख उंचावत गेला. त्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. परंतु, दुसरीकडे त्या राज बब्बरमुळेही (Raj babbar) चर्चेत येत होत्या. स्मिता पाटीलमुळे राज बब्बर आणि नादिरा यांचा संसार मोडला अशा टीका त्यांच्यावर झाल्या.
लिव्ह इन रिलेशनमध्ये होत्या स्मिता पाटील
राज बब्बरसोबत स्मिताने लग्न करु नये असं त्यांच्या आईचं ठाम मत होतं. त्यामुळे अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचे. परंतु, स्मिता पाटील यांनी घरातला विरोध झुगारुन ८० च्या दशकात राज बब्बर यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचं धाडस केलं. त्याकाळी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेन असं राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांना आश्वासन दिलं होतं. मात्र, कालांतराने या दोघांमधील संबंध बिघडत गेले. याच काळात प्रतिक बब्बरचा जन्म झाला आणि अवघ्या काही दिवसांमध्येच स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, व्हायरल इंफेक्शनमुळे स्मिता पाटील यांना ब्रेन इंफेक्शन झालं.ज्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यावेळी आपल्या चिमुकल्या बाळाला सोडून जाणं स्मिता पाटील यांना मान्य नव्हतं. परंतु, प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं.मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा एक-एक अवयव निकामी होऊ लागला. आणि, त्यांचा मृत्यू झाला. परंतु,आजही त्या प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत.