‘दबंग’ या सिनेमातून डेब्यू करणा-या सोनाक्षी सिन्हाने आजवर 20 चित्रपट केलेत. सोबत एक विक्रमही. 10 वर्षात बॉक्स ऑफिसवर 1500 करोडची कमाई करणारी ती बॉलिवूडची पहिली अभिनेत्री बनली आहे. होय, गत दशकभरात तिच्या चित्रपटांनी 1500 कोटींची कमाई केली. अर्थात याऊपरही सोनाक्षी बॉलिवूडवर नाराज आहे. होय, बॉलिवूडवरची ही नाराजी तिने स्पष्टपणे बोलून दाखवली. बॉलिवूडच्या अवार्डवरूनही तिने बॉलिवूडला चपराक लगावली.
एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या करिअरमधील चढउतारांवर खुलासा केला. ‘इंडस्ट्रीत मित्र बनतात आणि निघून जातात. लॉबी बनवून काम करण्याचा माझा स्वभाव नाही. मला काम द्या, असे म्हणत मी कोणत्याही निर्मात्यांकडे गेले नाही. भूमिका स्वत: माझ्याकडे चालत आल्या. मी माझ्या तत्त्वांवर ठाम राहिले. माझ्या कामावर मी खूश आहे,’असे ती म्हणाली.
बॉलिवूडच्या अवार्डबद्दलही ती बोलली. ‘उत्तम काम करणा-यांना अवार्ड मिळत नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. कुणाची मैत्रिण आहे म्हणून मला अवार्ड दिला जात असेल तर माफ करा. अशा अवार्डमध्ये मला काडीचाही रस नाही. प्रेक्षकांचे, चाहत्यांचे प्रेम हाच माझ्यासाठी सर्वात मोठा अवार्ड आहे. एकदा पॉप्युलर चॉईस अवार्ड मिळालेल्या अभिनेत्रीलाच क्रिटिक्ट अवार्ड दिला गेला. हे कसे काय? असे मी विचारले असता, त्या अभिनेत्रीची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी अधिक चांगली होती, असे मला सांगण्यात आले. अवार्ड देण्यासाठीचे हे लॉजिक मला अजिबात आवडले नाही. तेव्हापासून अवार्डवरचा माझा विश्वासच उडाला, ’असेही सोनाक्षीने सांगितले.सोनाक्षीला 2014 मध्ये ‘लुटेरा’ चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरेस्ट श्रेणीत नामांकन मिळाले होते. पण पुरस्कार मात्र मिळाला नाही. गत 6 वर्षात सोनाक्षीला एकही अवॉर्ड मिळालेला नाही.