मुंबईत मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे खूप नुकसाम झाले. लोकांच्या गाड्या मध्येच बंद पडल्या. इंजीनमध्ये पाणी गेल्यामुळे अभिनेत्री सोनाली सहगलची गाडीदेखील बंद पडली. मात्र इन्शुरन्स कंपनीनं तिला भरपाई देण्यास नकार दिला. यानंतर तिने इन्शुरन्स कंपनीला चांगलाच धडा शिकविला आणि त्यांना माफी मागण्यास भाग पाडलं.
सोनाली सहगलने याबद्दल सांगितलं की, मागील काही दिवसात खूप मुसळधार पाऊस पडल्यामुळे भररस्त्यात माझी कार बंद पडली. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी भरल्यामुळे असं झालं. कार बराच वेळ तिथे उभी राहिल्यामुळे पाण्यात सायलेंसर व इंजिन खराब झालं. कसेतरी क्रेनच्या माध्यमातून गाडीला जवळच्या कार वर्कशॉपमध्ये आणलं आणि मेकॅनिकने कार तपासल्यानंतर सांगितलं की, गाडीच्या आत पाणी गेल्यामुळे गाडीचे पार्ट खराब झाले.
मेकॅनिकने सल्ला दिल्यानंतर सोनालीने इन्शुरन्स कंपनी रॉयल सुंदरमला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली. इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीचं म्हणणं होतं की, सोनालीने त्या ठिकाणाहून गाडी हलवली आणि ओपन केली. त्यामुळे आता इन्शुरन्स कंपनी जबाबदार नाही. यासाठी सोनाली सातत्याने इन्शुरन्स कंपनीला फोन करत राहिली. मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिचा फोन उचलणं टाळलं.
त्यानंतर सोनालीने हा मुद्दा सामाजिक बनवण्याचा निर्णय घेतला. तिच्यानुसार, जेव्हा इन्शुरन्स कंपनी प्रसिद्ध व्यक्तींसोबत असं करू शकते तर सामान्य व्यक्तींसोबत असेच वर्तणुक करत असतील. तिने तिचा सहकलाकार जॉन अब्राहमचा चित्रपट सत्यमेव जयते सारखं सत्याला हत्यार बनवण्याचा निर्णय घेतला आणि इन्शुरन्स कंपनीची सोशल मीडियावर पोलखोल केली.
सोशल मीडियावर सोनालीने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर लोकांनी तिला समर्थन केले आणि इन्शुरन्स कंपनी विरोधात मानहानीचा दावा आणि तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीने त्यांची चुकी मान्य केली आणि आता तिला स्वतःहून संपर्क साधला.