Deewaniyat Movie: 'सनम तेरी कसम'च्या रि- रिलीजनंतर अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाने पुन: प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिस गाजवलं. 'सनम तेरी कसम'च्या या यशानंतर हर्षवर्धन राणे नव्या रोमॅंटिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. 'दीवानियत' असे या चित्रपटाचे नाव असून, हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नुकतीच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
लवकरच हर्षवर्धनचा 'दीवानियत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दीवानियत' चित्रपटात बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. परंतु, या चित्रपटात नायिकेची भूमिका कोण साकारणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात आता एक नवीन नाव समोर आलं आहे. या चित्रपटात प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाची वर्णी लागली आहे. अलिकडेच अभिनेत्री 'बागी-४' मुळे चर्चेत होती. 'बागी-४' नंतर सोनमची आणखी एका बॉलिवूडसिनेमामध्ये एन्ट्री झाली आहे. तिने स्वतः याबद्दल पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरुन ती चित्रपटात हर्षवर्धन राणेसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
दिग्दर्शक मिलाप जावेरी 'दीवानियत' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर मुश्ताक शेख यांनी चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे.
कोण आहे सोनम बाजवा?
अभिनेत्री सोनम बाजवा ही एक लोकप्रिय पंजाबी अभिनेत्री आहे. २०१३ मध्ये आलेल्या 'बेस्ट ऑफ लक' या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटानंतर तिची लोकप्रियता कमालीची वाढली.