आपल्या देशात आजही अनेक मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. लैंगिक शोषण हा सध्याचा अत्यंत ज्वलंत विषय आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सही याचा बळी ठरले आहेत. मात्र, काही अभिनेत्री या विषयावर गप्प राहतात. तर काही अभिनेत्री यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी खुलेपणाने आपल्यासोबत घडलेले अनुभव शेअर करतात. अभिनेत्री सोनम कपूर ही लैंगिक शोषणाची शिकार झाली होती. १३ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच केला होता.
सोनम कपूरने एका मुलाखतीत तिला वैयक्तिक आयुष्यात आलेला एक भयंकर किस्सा सांगितला होता. 'अक्ट्रेस राऊंडटेबल' या राजीव मसंद यांच्या शोमध्ये खुद्द सोनमनेच १३ वर्षांची असताना एका व्यक्तीने तिच्यासोबत लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला होता. ही घटना तिच्यासोबत मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये घडल्याचं तिनं सांगितलं. या घटनेने अभिनेत्री सोनम घाबरली होती. सोनमला वाटले की आपण काहीतरी चुकीचे केले आहे, त्यामुळे तिने याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते.
सोनम म्हणाली 'प्रत्येकजण बालपणात कधी ना कधी लैंगिक शोषणाचा बळी पडतो. मला माहित आहे की माझ्या लहानपणी माझाही विनयभंग झाला होता आणि तो माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. सुमारे दोन-तीन वर्षे मी याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. ती घटना मला आजपर्यंत पूर्ण आठवते. मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये मी माझ्या मैत्रिणींबरोबर चित्रपट पाहण्यासाठी गेले होते'.
सोनमने पुढे सांगितलं, 'आम्ही काही खायला घेण्यासाठी बाहेर आलो. तेव्हा एक माणूस माझ्या मागून आला आणि त्याने माझे स्तन दाबले. या घटनेमुळे मी थरथऱ कापू लागले होते. मला काय होतयं ते समजलंच नाही. मी तिथेच रडायला लागले. पण मी याबद्दल कोणाशीही बोलले नाही. मी परत आत जाऊन बसले आणि संपूर्ण चित्रपट पाहिला. कारण त्यावेळी मला वाटलं की मी काहीतरी चूक केली आहे'. ती घटना आठवल्यावर आजही मनात धाकधूक होत असल्याचं सोनमे सांगितलं होतं.