Join us

टुनटुन यांचं गाणं ऐकून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी पाकिस्तान सोडून भारतात आला होता तरुण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 3:44 PM

टुनटुन यांचा जन्म ११ जुलै १९२३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव उमा देवी असं होतं. महत्वाची बाब म्हणजे त्या उमादेवी नावाने सिनेमात गाणं गायच्या.

मुंबई : टुनटुन या ६० च्या दशकातील भारतातील पहिल्या महिला हास्य कलाकार होत्या. टुनटुन या पडद्यावर आल्या आल्या लोक हसायला लागायचे. टुनटुन यांचा जन्म ११ जुलै १९२३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव उमा देवी असं होतं. महत्वाची बाब म्हणजे त्या उमादेवी नावाने सिनेमात गाणं गायच्या.

टुनटुन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एका छोटाशा गावात झाला होता. टुनटुन जेव्हा तीन वर्षांच्या होतात तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. टुनटुन यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. टुनटुन या १३ व्या वर्षांपासूनच गाणं गायला लागल्या होत्या. १९४७ मध्ये त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली होती. गाण्याचं कोणतही शिक्षण न घेता त्यांच्या आवाजात एक वेगळेपण होतं. त्यांनी गायलेल्या सर्वच गाण्यांवर नूरजहाँ आणि शमशाद बेगम यांच्या गाण्याचा प्रभाव जाणवतो. 

टुनटुन यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यावेळी त्या १३ वर्षांच्या असताना घर सोडून मुंबईला पळून आल्या. इथे त्यांची भेट संगीतकार नौशाद अली यांच्यासोबत झाली. त्यावेळी त्या नौशाद यांना म्हणाल्या होत्या की, त्या गाणं गाऊ शकतात. आणि त्यांनी काम दिलं नाहीतर त्या समुद्रात जीव देतील. त्यावेळी नौशाद यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांना काम दिलं. 

टुनटुन यांच्यातील अभिनय कौशल्य पाहूनच नौशाद यांनी त्यांना हास्य कलाकार म्हणून काम करण्याचा सल्ला दिला होता. गायिकेपेक्षा त्या अभिनेत्री म्हणूनच अधिक लोकप्रिय झाल्या होत्या. टुनटुन यांचा पहिला सिनेमा 'बाबूल' हा होता. या सिनेमात दिलीप कुमार आणि नर्गीस यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमापासूनच त्यांचं नाव टुनटुन असं पडलं. त्यानंतर त्यांनी जवळपास १९८ सिनेमांमध्ये काम केलं. 

भलेही त्यांची ओळख एक हास्य कलाकार म्हणून असली तरी त्यांच्या गाण्यांचेही अनेक चाहते होते. टुनटुन यांचं 'अफसाना लिख रही हूं, दिले बेकरार का...'  हे गाणं ऐकून एक पाकिस्तानी युवक ज्याचं नाव अख्तर अब्बास काजी होतं, तो पाकिस्तान सोडून भारतात आला होता. त्याने टुनटुन यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर टुनटुन यांनी एकापाठी एक ४५ गाणी गायली. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम कमी केलं. पण पुन्हा त्यांनी काही वर्षांनी काम सुरु केलं होतं. पुढे २४ नोव्हेंबर २००३ मध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांच्या कामामुळे आजही त्यांना ओळखलं जातं. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी